वळसंग पोलिसांची `ऑपरेशन परिवर्तन’मधून दिशादर्शक वाटचाल
अरुण रोटे / सोलापूर
अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱया समूहाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. या समूहाला नवी दिशा देण्याचे काम पोलीस करीत आहेत. गुन्हेगारीचा शिक्का कायमचा पुसून टाकला जाणार असल्याने परिवर्तनाची चळवळ जोर धरत आहे. सकारात्मक विचारांच्या वाटेवरून जाण्याचा निर्णय घेतलेल्या काहींनी पोलिसांच्या चळवळीला बळ देण्यासाठी स्वत:मध्ये मानसिक बदल करून घेऊन नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिसांनी बदलाच्या नांदीला मूर्तस्वरूप दिले. अवैध दारू व्यावसायिकांनी सन्मानपूर्वक जगण्याचा मार्ग निवडून समाज आणि कुटुंबाला घातक ठरणाऱया अवैध दारू व्यवसायाची नाळ कायमची तोडली. दारूभट्टÎा आणि त्याची विक्री यात आकंठ बुडालेल्यांची मानसिकता बदलने हे जिकिरीचे आणि कष्टप्रद काम. प्रतिसाद मिळेल की नाही याची शाश्वती नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा अंदाज घेऊन त्यांच्या मनपरिवर्तनासाठी प्रयत्न करणाऱया वळसंग पोलिसांना मोठे यश मिळत आहे.
दक्षिण तालुक्यातील धोत्री, कुंभारी, दर्गनहळ्ळी व विडी घरकुल येथील सहा अवैध दारू व्यावसायिकांना नवीन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. ऑपरेशन परिवर्तन मोहिमेंतर्गत दारूची निर्मिती आणि विक्री यापासून परावृत्त करून त्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडण्यात येत आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दर्गनहळ्ळी येथील अवैध दारूशी संबंधित श्रीशैल वाघोले याचे मनपरिवर्तन केले. त्यासाठी पोलीस पाटील शशिकला पाटील, मल्लू बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, पोलीस हवालदार शामराव माने, मल्लिनाथ बंदिछोडे, बालाजी रेड्डी व गणेश पाटील यांची मदत बहुमोल ठरली. दारूरुपी विष विक्री करणारे ते हात आज गरजेच्या नित्य वस्तूंची विक्री करत असल्याने गावात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा मार्ग निवडलेल्या श्रीशैलचे कौतुक होत आहे.
त्यानंतर वळसंग पोलिसांनी धोत्री येथील अशोक आणि प्रकाश भोरे यांच्यात मानसिक बदल घडवून आणला. त्यांनी स्वत:कडे साठविलेली आणि बचत गटाकडून आर्थिक मदत घेऊन किराणा दुकान थाटले. यामुळे आजवर दारू विक्रेता म्हणून बघितल्या गेलेल्या बंधूकडे आज किराणा दुकानदार म्हणून पाहिले जात आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील यशवंत हिरोळे, शांतय्या स्वामी, पोलीस पाटील भीमशा पाटील यांनी परिवर्तनाच्या चळवळीत सहभाग नेंदविला. दरम्यान कुंभारी, विडी घरकुल परिसरात अवैध दारूचा व्यवसाय करणाऱया विजय मंजुळकर याने कपडÎाचे दुकान थाटले. त्यास पत्नीची साथ मिळाली. पोलिसांनी केलेले आवाहन भावी आयुष्यासाठी कसे उपयोगी आहे ते पतीला समजावून सांगून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
दारूच्या व्यवसायामुळे जिकडे फक्त शौकिनच जात होते त्याच जागी पुंभारी गावातील गोरख मंजुळकर याने किराणा दुकान उभारले. याचा चांगला परिणाम दिसून येत असून गावातील महिला, मुली, तरुण दुकानातून दररोज लागणाऱया वस्तू खरेदी करताना दिसतात. यामुळे कुंभारी गावातील गोरख ऑपरेशन परिवर्तनाचा धागा बनला. पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे यांनी स.पो.नि भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नाला यश आले. दरम्यान, कुंभारी येथीलच तरुणाला वळसंग पोलिसांनी मदत केल्याने तो आज शेळीपालनाच्या व्यवसायात स्वत:ची वाटचाल करत आहे. तर कुंभारी गावाजवळील आणखी एका तरुणाला किराणा व्यवसायाकडे वळविण्यात आले. ऑपरेशन परिवर्तनाच्या बदलाचा भाग होऊन तोही आज नवीन पण सन्मानजनक मार्गाने स्वत:ची आणि कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण करण्यात गुंतला आहे.
सन्मानजनक मार्ग निवडा
दारूने कोणाचे भले झाले नाही. समाजमान्यता आणि प्रतिष्ठा नसलेल्या या अवैध व्यवसायाने कुटुंबातील भावी पिढीचेही नुकसानच होण्याची शक्यता असते. आपल्या व्यवसायावरून घरातील सदस्यांना हिणवले जाते. त्यांना कोणत्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सांगणार असे अनेक प्रश्न या अवैध व्यवसायातून निर्माण होतात. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अवैध व्यवसायापासून परावृत्त होऊन सन्मानजनक मार्गाची निवड करावी.
-अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे