देवराष्ट्रे / प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यात अवैध धंद्यानी ऊच्चांक गाठला असून तालुक्याच्या ग्रामीण भागात जुगार, मटका, बेकायदा दारु विक्री जोमात सुरू आहे. यामुळे तरुण वाममार्गाला लागला असुन तरुणांमध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढली आहे. तर तालुक्यातील येरळा व नांदणी नदीतुन बेसुमार वाळुऊपसा होत आहे. अन्य गौणखनिजची वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे तालुक्यातील महसुल विभागासह पोलीस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. अवैध धंदे व गौणखनिज तस्करीमध्ये कडेगाव तालुका जिल्हयात टाॅपवर पोहचला असुन लोकप्रतिनिधीचेही याकडे दुर्लक्ष आहे.
जिल्ह्याच्या एका टोकाला असणारा व लहान तालुका म्हणुन कडेगाव तालुक्याची ओळख आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाशी झगडलेला हा तालुका सिंचन योजनांमुळे अलिकडच्या काळात समृद्धीचे दिवस पाहत आहे. ही परस्थिती असताना गत काही दिवसांपासुन तालुक्यात अवैध धंद्याची पाळेमुळे घट्ट होत चालली आहेत. गावातील प्रमुख चौकातच अवैध धंद्याचे अड्डे निर्माण झाले आहेत. अवैध धंद्याची साखळी मोठी आहे. पोलीस खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी घेण्यापलिकडे पोलीसांचे अन्य काम नाही का असा प्रश्न पडत आहे.
याचबरोबर तालुक्यातील येरळा व नांदणी नदीतुन बेकायदा वाळुऊपसा होत आहे. वाळुतुन मोठे अर्थकारण होत असल्याने अनेक मातब्बर या व्यवसायात ऊतरले आहेत. यंत्रांच्या माध्यमातुन वाळुऊपसा होत असुन डंपर, टॅक्टर च्या माध्यमातुन दररोज शेकडो ब्रास वाळुवाहतुक होत आहे. वाळुऊपशाने अनेक ठिकाणी नदीतील खडक वर आले आहेत. नदीकाठची काही गावे वाळुसाठी फेमस आहेत. तर मुरूम, रेतीचीही तस्करी तालुक्यात जोमात आहे. प्रशासन कारवाईचा फार्स करत आहे. त्यामुळे तस्करांची मजल हल्ले करण्यापर्यत गेली आहे. गौणखनिज तस्करीने शासनाचा कोट्यावधींचा महसुल बुडत आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.