कोल्हापूर : प्रतिनिधी
अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या कार्यालयास संपर्क साधावा किंवा तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्येशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य तर सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक हे सदस्य सचिव आहेत.
अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी समितीकडे मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, न्यू शाहूपुरी, भू-विकास बँक इमारत, 3 रा मजला, हॉटेल पर्लजवळ, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. 0231-2656258) येथे संपर्क साधावा.