कोरोना काळात स्वतःच्या हक्काच्या घराचं महत्त्व खूप वाढलं आहे. म्हणूनच येत्या काळात अनेकांचं घर घेण्याला प्राधान्य असेल. घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घ्यावं लागतं. कर्ज म्हटलं की व्याज आलं. गृहकर्जावरील व्याजदराच्या तीन योजना आहेत. फिक्स्ड, फ्लोटिंग आणि फ्लेक्सी यापैकी एका योजनेची निवड तुम्ही करू शकता.
फिक्स्ड इंटरेस्ट योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड होईंपर्यंत तुम्हाला ठरलेल्या दराने व्याज द्यावं लागतं. या व्याजदरात अखेरपर्यंत कोणताही बदल होत नाही. म्हणजे तुमचा हप्ता कमी किंवा जास्त होत नाही. बाजारपेठेतले चढउतार किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये बदल केल्यानंतरही तुमच्या व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. व्याजदरांमध्ये वाढ झाल्यास तुमच्या खिशाला कात्री लागत नाही. मात्र व्याजदर कमी झाल्यास त्याचे लाभही मिळत नाहीत.
फ्लोटिंग व्याजदरात बेस दरांमधल्या चढउतारांनुसार बदल होतात. फ्लोटिंग व्याजदर फिक्स्ड म्हणजे कायमस्वरुपी व्याजदरांपेक्षा कमी असतात. मात्र रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये वाढ केल्यास फ्लोटिंग व्याजदरांमध्ये वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत फ्लोटिंग व्याजदर योजनेअंतर्गत जास्त हप्ता भरावा लागतो. त्याचप्रमाणे रेपो दर कमी झाल्यास त्याचे लाभही मिळतात.
फ्लेक्सी व्याजदरांमध्ये फिक्स्ड आणि फ्लोटिंग योजनांचं मिश्रण पहायला मिळतं. या अंतर्गत कर्ज घेतल्यानंतर ग्राहक आपल्या गरजेनुसार फिक्स्ड किंवा फ्लोटिंग व्याजदरांची निवड करू शकतो. फ्लेक्सी योजनेत सुरूवातीला ठराविक दराने व्याज आकारलं जातं. मात्र भविष्यात व्याजदर कमी झाल्यास तुम्हाला फ्लोटिंगचा पर्याय निवडता येतो. मात्र ही संधी फक्त एकदाच दिली जाते.