आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तर चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. या चित्रपटाची क्रिप्ट ऐकल्यावर आलिया खर तर पळून गेली होती. ही व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला जमेल की नाही याबाबत तिच्या मनात शंका होती.
पण मग दुसऱया दिवशी असा काय चमत्कार झाला की आलिया गंगूबाईसाठी तयार झाली. याचा किस्सा संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने सांगितला.
संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं की, आलिया चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर ऑफिसमधून पळून गेली होती. आलियाची अशी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांना असं वाटल की आता तिच्याऐवजी दुसऱया अभिनेत्रीचा शोध सुरू करायला हवा. त्यानुसार या चित्रपटासाठी दुसऱया अभिनेत्रीचा शोध सुरू करण्याचाही विचार झाला. पण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना या चित्रपटात गंगूबाईच्या भूमिकेसाठी आलियाच हवी होती आणि तसंच झालं. भन्साळींना दुसऱया दिवशी आलियाचा फोन आला आणि तिने भन्साळी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भन्साळी तिला म्हणाले की तुला या चित्रपटासाठी नकार द्यायचा असेल तर मला भेटण्याची गरज नाही.’ पण या बोलण्याने आलियाचा अहंकार दुखावला. आपला नकार म्हणजे आपल्या अभिनयक्षमतेवर शंका असा विचार तिने केला आणि ती गंगूबाई साकारायला तयार झाली. या सिनेमात गंगूबाईची विशिष्ट लहेजातील बोलीभाषा आहे. ती भाषा आणि त्या भाषेचा लहेजा शिकण्यासाठी अलियाने 20 दिवसांचे वर्कशॉपही केले आहे हे विशेष.