वृत्तसंस्था/ रावळपिंडी
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने यजमान पाकला पहिल्या डावात 272 धावांवर रोखले. पाकच्या फहीम अश्रफने नाबाद अर्धशतक (78) झळकवले. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 5 गडी बाद केले. दिवसअखेर द. आफ्रिकेने पहिल्या डावात 4 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली आहे.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पाकने पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेवर आघाडी घेतली आहे. बऱयाच वर्षानंतर पाक संघाला दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेत पराभव करण्याची संधी लाभली आहे. पाकने 3 बाद 145 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम यांनी चौथ्या गडय़ासाठी 123 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी पाकची स्थिती 3 बाद 22 अशी केविलवाणी होती.
फवाद आलमने 5 चौकारांसह 45 तर कर्णधार बाबर आझमने 127 चेंडूत 12 चौकारांसह 77 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्जेने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकच्या तळाच्या फलंदाजांना अधिक धावा जमविण्यापासून रोखले. फहीम अश्रफने एकाकी लढत देत 160 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 78 धावा जमविल्याने पाकला 272 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद रिझवानने 18 धावा जमविल्या. हसन अली आणि यासीर शहा प्रत्येकी 8 धावांवर बाद झाले. 114.3 षटकात पाकचा पहिला डाव 272 धावांत आटोपला. द. आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 56 धावात 5, केशव महाराजने 3 तर मुल्डेरने 1 गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. इल्गार आणि मार्करेम यांनी सलामीच्या गडय़ासाठी 26 धावांची भर घातली. पण सहाव्या षटकात हसन अलीने इल्गारला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला व्हॅनडेअर डय़ूसेन खाते उघडण्यापूर्वीच हसन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
नौमन अलीने मार्करेमला आफ्रिदीकरवी झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. तत्पूर्वी डय़ूप्लेसिस अश्रफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. दिवसअखेर बेहुमा 15 तर कर्णधार डिकॉक 24 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 28 षटकात 4 बाद 106 धावा जमविल्या असून ते अद्याप 166 धावांनी पिछाडीवर आहेत. पाकतर्फे हसन अलीने 2 तर अश्रफ आणि नौमन अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव- 114.3 षटकात सर्वबाद 272 (बाबर आझम 77, फहीम अश्रफ नाबाद 78, फवाद आलम 45, इम्रान बट 15, मोहम्मद रिझवान 18, नॉर्जे 5/56), द. आफ्रिका प. डाव- 28 षटकात 4 बाद 106 (इल्गार 15, मार्करेम 32, व्हॅनडेअर डय़ुसेन 0, डय़ूप्लेसीस 17, बेहुमा खेळत आहे 15, डिकॉक खेळत आहे 24, हसन अली 2/29, अश्रफ 1/16, नौमन अली 1/19).