जागरूक नागरिक आक्रमक, उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे, पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यातील जलस्त्रोत खात्याच्या मालकीच्या चापोली धरणाजवळ दिवसाढवळय़ा एका अश्लिल व्हिडीओचे चित्रीकरण केल्याप्रकरणी जागरूक काणकोणवासीय आक्रमक बनले असून आज गुरुवारी काणकोण बंद पुकारण्यात आला आहे. या प्रकरणात काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, त्यांचे दोन सहकारी आणि जलस्त्रोत खाते गुंतलेले असल्याचा दावा करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी करत जागरूक नागरिकांनी मंगळवारी सकाळी सरळ काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे धरले. यात सत्ताधारी भाजपसहित सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अशा प्रकारांना या ठिकाणी थारा देण्यात येणार नाही असा नारा दिल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी गटांतील प्रमुख नेत्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गर्दी केली. यावेळी पोलीस निरीक्षक चव्हाण यांना त्वरित निलंबित केले नाही, तर काणकोण बंद करण्याचा इशारा जागरूक नागरिकांनी दिला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोणच्या नगराध्यक्षा नीतू देसाई, नगरसेवक दिवाकर पागी, श्यामसुंदर देसाई, गुरू कोमरपंत, काणकोण भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष नंदीप भगत, सचिव दामोदर च्यारी, भूषण प्रभुगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर, प्रवक्ते प्रशांत नाईक, महिला काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो, जनार्दन भंडारी, विठू मोरजकर, प्रलय भगत, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, गोंयकार संघटनेचे जॅक फर्नांडिस, विकास भगत, आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, संजू नाईक, सामाजिक कार्यकर्ते शांताजी गावकर व अन्य अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. या प्रकरणात जे गुंतले आहेत त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर
बॉलिवुड अभिनेत्री असलेल्या पूनम पांडे हिने 6 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पाळोळेच्या सोबित सरोवर या तारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मागच्या महिन्यात हीच महिला सदर हॉटेलात हनिमूनसाठी आल्यावेळी आपल्या नवऱयाविरुद्ध तिने मारहाणीची तक्रार केली होती. त्याच महिलेने सदर व्हिडीओचे चित्रीकरण केलेले असून त्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वापर करून घेतला आहे. चापोली धरणाजवळ जाणाऱया प्रत्येकाची चौकशी केली जाते. मात्र असा प्रकार यावेळी घडला नाही. उलट काणकोणच्या पोलीस निरीक्षकांनी दोन साध्या वेषातील पोलीस या ठिकाणी ठेवले. जलस्त्रोत खात्याच्या रक्षकाचे तोंड बंद करण्यात आले. या चित्रीकरणासाठी किमान अर्धा दिवस चापोली धरणाचा परिसर वापरला गेला. त्यासाठी चापोली धरणाच्या मुख्य टाकीची रंगरंगोटी करण्यात आली. आवश्यक असलेला परवाना स्थानिक श्रीस्थळ पंचायत अथवा मनोरंजन संस्थेकडून घेण्यात आला नाही. सर्व काम उरकल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून दोन दिवस अगोदर हॉटेल सोडण्याचा सल्ला सदर महिलेला देण्यात आला, असा स्पष्ट आरोप जागरूक नागरिकांनी यावेळी केला. असे असताना काणकोणचे निरीक्षक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करतात. यात काळेबेरे असल्याचा आरोप या प्रकरणातील पहिले तक्रारदार सम्राट भगत तसेच सिद्धार्थ देसाई, गौरव भगत, शांताजी गावकर, प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर, जॅक फर्नांडिस यांनी केला.
आत्मदहनाचा इशारा
आपल्याला प्रसिद्धीची हाव नाही. सदर व्हिडीओ आपल्या 13 वर्षांच्या मुलीने पाहिला. या अश्लिल व्हिडीओमुळे काणकोणच्या सांस्कृतिक अस्मितेचा ऱहास झाला आहे. खऱया गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर आपण काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ स्वतःवर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करेन, असा इशारा सम्राट भगत यांनी दिला. तर सदर व्हिडीओ आपल्या 3 वर्षांच्या मुलीने पाहिला आणि आपण अस्वस्थ झाल्याचे गौरव भगत यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून आश्वासन
उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नागरिक जमायला लागल्यानंतर साधारणपणे दुपारी 12 च्या दरम्यान उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल यांनी सर्वांची बाजू ऐकून घेऊन वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत ही माहिती पोहोचविणार असल्याचे सांगून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, निरीक्षक राजू देसाई, दीपक पेडणेकर, तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले गेले अणि यावर तोडगा काढला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. मात्र हट्टाला पेटलेल्या जागरूक काणकोणकारांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी येऊन काय तो निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी केल्यानंतर अधीक्षक परमजित सिंग यांनी काणकोणला येऊन बाजू समजून घेतली आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले.
दोषींना कडक शासन व्हावे : तवडकर
माजी मंत्री तवडकर यांनी यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे संपर्क साधलेला असून जे दोषी आहेत त्यांना कडक शासन हे व्हायलाच हवे, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे अश्लिल व्हिडीओ गोव्यात कोठेच चित्रीत करण्याचे धाडस यापुढे होणार नाही असा धडा यात गुंतलेल्या सर्वांनाच शिकवायला हवा, असे ते म्हणाले.