अष्टपैलू अक्षर पटेलची कोरोनावर मात
चेन्नई / वृत्तसंस्था
अष्टपैलू अक्षर पटेलने कोरोनावर मात केली असून शुक्रवारी तो दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला. 20 दिवसांच्या क्वारन्टाईन कालावधीनंतर संघसहकाऱयांना भेटणे हा कसोटी पदार्पणानंतर दुसरा सर्वोत्तम क्षण होता, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.
27 वर्षीय अक्षर पटेल दि. 28 मार्च रोजी कोरोना निगेटिव्ह अहवालासह मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाला. पण, दि. 3 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यावेळी त्याला तातडीने बीसीसीआयच्या मेडिकल फॅसिलिटीत दाखल केले गेले. दिल्लीचा पुढील सामना उद्या (रविवार दि. 25) सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
‘मी माझ्या रुममध्ये तब्बल 20 दिवस एकटाच होतो. त्या कालावधीत मी सर्व सामने पाहिले. माझ्या संघाने आपले बरेच सामने जिंकले. मीही संघात लवकर परतण्यासाठी त्यावेळी प्रोत्साहित होतो, असे अक्षरने यावेळी नमूद केले. दिल्ली कॅपिल्टस प्रँचायझीने अक्षरचे स्वागत केले आणि बापू संघात परतला, तो आनंददायी क्षण असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी याबद्दलचा एक व्हीडिओ देखील पोस्ट केला.
अक्षर पटेलने बुधवारी आपल्या सर्व संघसहकाऱयांसमवेत पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. घाईघाईने कठोर मेहनत घेण्यावर माझा भर नाही. मी वैद्यकीय पथकाशी सराव कसा सुरु करावा, याबद्दल चर्चा केली. कर्णधार रिषभ पंत व मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या सूचनाही मी अमलात आणत आहे, असे त्याने पुढे नमूद केले. अक्षर पटेल हा या मोसमात कोरोनाबाधित होणारा दुसरा खेळाडू ठरला. आरसीबीच्या देवदत्त पडिक्कलला देखील यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आणि त्यानेही यावर मात करत संघात पुनरागमन केले आहे.