प्रतिनिधी /म्हापसा
अस्नोडा पंचायतीवर आता पुन्हा माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या समर्थकाची सरपंचपदी वर्णी लागलेली आहे. महिला पंचायत सदस्य रोशनाली कवळेकर यांची अलीकडेच सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून थिवी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर व कोलवाळ जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
थिवी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजप आमदार निळकंठ हणर्ळकर करीत असले तरी या मतदारसंघातील सात पैकी कोलवाळ व पीर्ण या दोनच पंचायतीवर त्यांचे तथा भाजपचे प्राबल्य आहे. थिवी, शिरसई, रेवोडा, नादोडा व अस्नोडा अशा अन्य पाचही पंचायतींवर किरण कांदोळकर यांच्या समर्थक असलेले पंचायत सदस्य सत्तारूढ गटात आहेत. विधमान कार्यकाळात अस्नोडा पंचायतीवर कांदोळकर यांचे समर्थक असलेलाच पंचायत सदस्य सरपंचपदी निवडून आला आहे. पण हे सरपंचपद आळीपाळीने विभागून दिले जात असल्याचे जाणवते.
या नऊ सदस्यीय पंचायतीवर सध्या किरण कांदोळकर यांच्या समर्थक असलेल्या गटातील पंचायत सदस्यांची संख्या पाच असून त्यामध्ये रोशनाली कवळेकर, शंकर नाईक, प्रवीण बुगडे, छाया बिचोलकर, शैलेश साळगावकर यांचा समावेश आहे. विरोधी गटात सपना मापारी, उदय मापारी, मेघश्याम चोडणकर व सलोनी पेडणेकर हे भाजप पुरस्कृत तथा आमदार निळकंठ हणर्ळकर यांना समर्थन देणाऱया पाच पंचायत सदस्यांचा समावेश आहे. सरपंचपदाच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी गटातील सर्व पंचायत सदस्य अनुपस्थित होते. तर सत्ताधारी गटातील पंचायत सदस्य उपस्थित होते.