वार्ताहर / थिवी
आज पहाटे सुमारे 4 वा. अस्नोडा बसस्थानकापासून 500 मिटर अंतरावर नवीन बागायत बाजाराच्या इमारतीसमोर हमरस्त्यावर भला मोठा आमवृक्ष कोसळल्यामुळे डिचोली ते म्हापसा ये-जा करणारी वाहने सुमारे आठ तास खोळंबून राहिल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. यात विजेचे तीन खांब व संरक्षण भिंत कोसळली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
सदर आमवृक्ष कोसळल्याने अस्नोडा परिसर व इतर ठिकाणची वीज पुरवठा खंडित झाला. याबद्दल अस्नोडा पंचायतीच्या सदस्यांना माहिती मिळताच अस्नोडाचे सरपंच शंकर नाईक, पंच सदस्य प्रविण बुगडे, शैलेश साळगावकर, रोशनाली कवळेकर, छाया बिचोलकर तसेच ग्रामस्थ प्रज्योत आराबेकर, नागराज, चंद्रकांत बुगडे, फ्रान्सिस वाझ व तरुणांनी मदत केली. व याकामी अस्नोडा येथील अमित अर्थ मुवर्सच्या मालकाने आपले जेसीबी मशीन व कामगार पुरवून आमवृक्ष हटविण्यास मोलाची कामगिरी बजावली. तसेच डिचोलीच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी शिवाजी नाईक, भरत नाईक, आदित्य नाईक, प्रवीण गांवकर व साईनाथ केसरकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून आमवृक्ष कापून बाजूला केला व मुख्य रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.