अनुदानासाठी अर्ज करण्याची शक्यता कमीच :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात अॅपल स्टोअर्स उघडल्यानंतर आणि आयफोनच्या उत्पादनानंतर, सरकारने आशा केली होती की अॅपल आता पीएलआय 2.0 योजनेअंतर्गत सबसिडीचा फायदा घेऊन देशात लॅपटॉप आणि संगणकांचे उत्पादन सुरू करू शकेल. मात्र, त्याची शक्यता खूपच कमी असल्याची माहिती मिळते आहे. अॅपलने पीएलआय 2.0 योजनेमध्ये विशेष स्वारस्य दाखवलेले नाही.
एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अॅपल लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हार्डवेअरसाठी प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय 2.0) योजनेसाठी अर्ज करणार नाही. केंद्राने अलीकडेच 17,000 कोटी रुपयांसह ही योजना सुरू केली, ज्याचा उद्देश डेल, सॅमसंग आणि अॅपल सारख्या कंपन्यांना भारतात आयटी हार्डवेअर तयार करण्यासाठी प्रवृत्त करणे हा होता.
अहवालात असे म्हटले आहे की टेक जायंट सध्या फक्त भारतातील मोबाइल आणि अॅक्सेसरीज उत्पादनांना लक्ष्य करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयालाही याची माहिती आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
19 मे रोजी तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ब्लूमबर्गशी बोलताना अॅपल आणि सॅमसंग या कंपन्या भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा विस्तार करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. अॅपलला देशात आयफोन आणि अॅक्सेसरीजच्या निर्मितीसाठी पहिल्या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र, कंपनी भारताऐवजी व्हिएतनाममध्ये लॅपटॉपचे उत्पादन वाढविण्याचा विचार करत आहे. 2023 च्या मध्यापर्यंत तेथे मॅकबुक बनवण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. याचा भारतालाही फायदा होऊ शकतो कारण भारत-व्हिएतनाम मुक्त व्यापार करारानुसार व्हिएतनाममध्ये असेंबल केलेले लॅपटॉप भारतात शुल्कमुक्त विकले जातील.
अॅपल स्टोअरची कमाई 25 कोटींच्या घरात
अॅपलच्या दिल्ली आणि मुंबईतील नवीन स्टोअरने एका महिन्यात 22 ते 25 कोटी रुपयांच्या उत्पदनांची विक्री केली आहे. अॅपल स्टोअर कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर म्हणून उदयास येत आहे. अॅपल स्टोअर 18 एप्रिल रोजी मुंबईत आणि दोन दिवसांनी दिल्लीत सुरु करण्यात आले होते. अॅपलचे सीईओ टिम कुक दोन्ही स्टोअरच्या उद्घाटनाला उपस्थित होते.