प्रतिनिधी/ पणजी
येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱया 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बांगलादेशला कंट्री फोकस म्हणून निवडले आहे. कंट्री फोकस हा विभाग आंचिममधील विशेष विभाग असून यात विशिष्ट देशातील चित्रपटविषयक उत्कृष्टता अणि योगदानास मान्यता देण्यात येते. बांगलादेशच्या चार चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. बांग्लादेश आणि भारत यातील सांस्कृतिक देवाण घेवाण करण्यासाठी यंदा आंचिममध्ये बांग्लादेश कंट्री फोकस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तन्वीर मोकाम्मेल यांचा जिबोन्धुली, झहीधूर रहीम अंजन यांचा मेघमल्लार, रूबियत होसेन यांचा ‘अंडर कन्स्ट्रक्शन’, नुहाश हुमायूं, सय्यद अहमद शौकी, राहत रहमान जॉय, एमडी रोबिउलम, गोलमकिब्रियाफरोकी, मीर मुकर्रम हुसेन, तन्वीर अहसन, महमूदुल इस्लाम, अब्दुल्ला अल नूर, कृष्णेंदू चटोपाध्याय, सय्यद सालेह अहमद सोभान यांचा ‘सिन्सीयरली युअर्स ढाका’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
तन्वीर मोकाम्मेल यांचा जिबोन्धुली हा 2014 सालातील चित्रपट जो 1971 सालातील युद्धकाळात ढोलकी वाजविणारा आणि त्यांच्या कुटुंबाभोवती फिरत राहतो. झहीधूर रहीम अंजन यांचा मेघमल्लार हा चित्रपट एक सामान्य कुटुंबाचे अनुसरण करते जे संघर्षादरम्यान जीवनात बदल घडवून आणतात. रूबियत होसेन यांचा ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ हा चित्रपट बांग्लादेशच्या शहरी भागात राहत असलेल्या स्वतःला शोधण्यासाठी धडपडणारी एका आधुनिक महिलेची कथा सांगतो. या चित्रपटात भारतीय अभिनेते शहाना गोस्वामी आणि राहुल बोस मुख्य भूमिकेत आहेत. ‘सिन्सीयरली युअर्स ढाका’ हा चित्रपट बांग्लादेशमध्ये राहणाऱया लोकांवर आधारित चित्रपट आहे.
ऑटिझमवर प्रकाश टाकणारा ‘इन अवर वर्ल्ड’
आंचिममध्ये तीन मुलांच्या कथनातून ऑटिझमच्या अनेक छटा दाखवण्यात येणार आहेत. श्रेड क्रिएटिव्ह लॅब प्रा. लि.च्या ‘इन अवर वर्ल्ड’ या लघुपटाची इंडियन पॅनोरमाच्या नॉन फिचर फिल्म विभागात अधिकृत निवड झाली असून दि. 18 रोजी या लघुपटाचा प्रीमीयर होणार आहे. श्रेड क्रिएटिव्ह लॅबचे फिल्ममेकर श्रीधर बी. एस. दिग्दर्शित व निर्मित आहे. श्रीधर यांना सर्जनशील उत्कृष्टतेसाठी 43 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ऑटिस्टिक मुलांच्या जीवनाचे पैलू
हा लघुपट तीन ऑटिस्टिक मुलांच्या जीवनाचे अनेक पैलू समोर आणतो. पालक, थेरेपिस्ट, त्यांचे दैनंदिन कार्य म्हणजे पोहण्याचे वर्ग, घोडेस्वारी आणि संगीताचे धडे, त्यांचे पालकांसमवेत असलेले खास क्षण कथेत रूपांतरित करण्यात आले आहेत. हा लघुपट ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजेच एएसडीची माहितीच्या पलीकडील माहिती देतोच याशिवाय त्या मुलांचे अनुभव, त्यांची रोजची तडजोड आणि समाजात राहण्याच्या प्रयत्नांद्वारे आम्हाला सहानुभूती नको तर आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार करा, आम्हाला जगात समान आदर आणि प्रेमाने सहअस्तित्त्वात राहण्यासाठी जगाने समजणे आवश्यक आहे, असे सांगतो.
श्रीधर बी. एस. या लघुपटाचे दिग्दर्शक व निर्माता म्हणाले, “सध्या आपण ज्या जगात जगतो त्यात ते आणि आम्ही असे दोन भिन्न जग आहेत. हा लघुपट अशी एक खिडकी आहे ज्यातून जगाला समाजातील रूढ आचारविचारांतून त्यांना प्रेमाने समजून घेण्यास सांगून या जगात आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि सहअस्तित्त्वाने राहण्यास प्रोत्साहन देतो.