प्रतिनिधी / वास्को
51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात आगमन झाले. या चित्रपट महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे पालन करावे लागणार असल्याने मंत्री जावडेकर यांनी गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील दर्शकांना ऑनलाईन माध्यमातून या सोहळय़ाचा लाभ घेणे शक्य असल्याचे म्हटले आहे.
आजपासून गोव्यात 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होणार असून आज संध्याकाळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले. गोव्यातील यंदाचा हा अठरावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. मात्र, यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने दरवर्षी प्रमाणे दर्शकांना या महोत्सवातील कार्यक्रमांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येणार नाही. दर्शकांना यंदा या महोत्सवात ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार भाग पडणार आहे. या महोत्सवातील कार्यक्रमांचे ऑनलाईन प्रसारण करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शुक्रवारी संध्याकाळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बेलताना ऑनलाईन माध्यमावरच भर दिला. आज शनिवारपासून सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळ व महोत्सवातील इतर कार्यक्रमांचा लाभ गोव्यातील व गोव्याबाहेरील दर्शकांना ऑनलाईन माध्यातून घेता येईल. त्यासाठीच ऑनलाईन प्रसारणाची व्यवस्था सरकारने केलेली आहे. तसेच सामाजीक अंतर राखून व मास्क परीधान करून ज्या दर्शकांना हा उद्घाटन सोहळ व अन्य कार्यक्रम प्रत्यक्ष पाहणे शक्य होईल ते दर्शक हे कार्यक्रम पाहू शकतील असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. यंदा कोविड महामारीचे निर्बंध असूनही हा चित्रपट महोत्सव उत्कृष्ठरीत्या पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.