ऑनलाईन टीम / कृष्णा :
आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील वेदाद्री गावाजवळून जात असलेला ट्रॅक्टरला एका ट्रकने जोरदार टक्कर दिली. ही धडक एवढी जोरात होती की, या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या वेळी ट्रॅक्टरमध्ये 26 लोक होती. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.