ऑनलाईन टीम / हैदराबाद :
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे कोविड केअर सेंटर असलेल्या एका हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
विजयवाडा येथील स्वर्ण पॅलेस हॉटेल कोविड केअर सेंटरसाठी रूपांतरित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 30 कोरोना रुग्ण आणि 10 वैद्यकीय कर्चचारी होते. आज सकाळी अचानक या कोविड सेंटरला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी 17 रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढले आहे. तर काहींनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपली सुटका करून घेतली. या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याला वेग आला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.