प्रतिनिधी/ सातारा
तुझ्या वडिलांवर आमचा विश्वास नसल्याने तुझ्या आईचे दागिने तसेच एक दुचाकी आम्ही बँकेत ठेवतो, तू सज्ञान झाल्यावर तुला परत देतो, असे सांगून एकूण 3 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज घेवून तो बँकेत न ठेवता स्वतःजवळ ठेवत माझा व माझ्या वडिलांचा विश्वासघात केला असल्याची तक्रार नाजमिन समीर शेख (वय 16, रा. गुरुवार पेठ, सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार नाजमिन शेख याचे आजोळकडील नासिर लतिफ शेख, नौशाद नासिर शेखर, तौफिक नासिर शेख सर्व (रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव) व अजूंम समीर होडगीकर, (रा. रामवाडी, ता. पेण), मुद्दसर बागवान (रा. समर्थ मंदिर सातारा) व असलम बागवान (रा. राजवाडा, सातारा) यांनी नाजमिनकडून त्याच्या आईचे सोन्या चांदीचे दागिने व एक दुचाकी असा एकूण 3 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज त्याच्या आईच्या नौशाद नासिर शेख नावे बँकेत ठेवतो असे सांगून घेवून गेले. व हा ऐवज तू सज्ञान झाल्यावर देवू असे सांगितले होते. ही घटना 24 नोव्हेंबर 2019 मध्ये दिव्यनगरी, कोंडवे, ता. सातारा येथे घडली होती.
त्यानंतर या सर्वांनी दागिने तसेच गाडी बँकेत न टेवता स्वतःजवळ ठेवून व स्वतःचे म्हणून वापरत असल्याचे समोर आले. त्यामुळे नाजमिन शेखने तिचा व तिच्या वडिलांचा आजोबा व त्यांच्या घरातील नातेवाईकानी विश्वासघात केला असल्याची तक्रार दिली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.