सूरतमध्ये 241 बाधित मातांकडून केवळ 13 नवजातांना कोरोना : महत्त्वपूर्ण माहिती समोर
परिस्थिती कशीही असो आई सदैव स्वतःच्या मुलांचे रक्षण करते. कोरोनाकाळातही ही बाब सिद्ध झाली आहे. आई या महामारीतही मुलांसाठी ढाल ठरत आहे. आईचे दूध रक्षाकवच ठरले आहे. आई कोरोनाबाधित असली तरीही तिच्या बाळाला संसर्ग झालेला नाही. कोरोना काळात गुजरातच्या सूरत येथील दोन शासकीय रुग्णालयांमध्ये 241 कोरोनाबाधित गरोदर महिलांची प्रसूती झाली. यातील केवळ 13 नवजातच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
नवजातांमध्ये लक्षणे नाहीत
निर्धारित प्रक्रियेनुसार अन्य नवजातांची चाचणी करण्यात आली. परंतु कोरोनाचे कुठलेच लक्षण त्यांच्यात दिसून आलेले नाही आणि तसेच आतापर्यंत या बाळांना कुठलीच समस्या झालेली नाही. तर 228 नवजात कोरोना निगेटिव्ह आढळून आले आहेत. यादरम्यान कोरोनाबाधित मातेवर उपचार सुरू होते. नवजात स्तनपान करत राहिले, परंतु कुठल्याही नवजाताला कुठलीच समस्या झालेली नाही. काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संशोधनातही पुष्टी
प्रसूतीनंतर कोरोनाबाधित मातेकडून तिच्या नवजात बाळाला कोरोनाचा संसर्ग होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अलिकडेच एक संशोधन करण्यात आले आहे. 120 नवजातांवर झालेल्या संशोधनात आवश्यक खबरदारी घेतल्यास संक्रमित मातेकडून नवजाताला कोविड-19 ची लागण होत नसल्याचे आढळून आले आहे. जन्माच्या दोन आठवडय़ांपर्यंत स्तनपान करविणे आणि संपर्कानंतरही संसर्ग होत नाही.
स्तनपान सुरक्षित
महामारीच्या प्रारंभी तज्ञांनी माता आणि नवजाताला वेगवेगळे ठेवण्याची सूचना केली होती. परंतु योग्य खबरदारी बाळगल्यास माता नवजाताला स्तनपान करवू शकते आणि ते सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन अकॅडमी ऑप पीडियाट्रिक्सने म्हटले आहे. चांगल्या प्रकृतीसाठी माता आणि नवजाताला परस्परांचा शारीरिक स्पर्श अत्यंत आवश्यक आहे.
असे झाले संशोधन
न्यूयॉर्कच्या 3 रुग्णालयांमध्ये 120 नवजातांवर 12 मार्चपासून 17 मेदरम्यान संशोधन झाले. जन्माच्या 24 तासातच त्यांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. 79 नवजातांची 5 ते 7 दिवसांमध्ये दुसऱयांदा चाचणी करण्यात आली. यातील 72 नवजातांची दोन आठवडय़ांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कुठल्याही नवजाताचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही तसेच त्यांच्यात कुठलीच लक्षणे दिसून आली नाहीत.
या गोष्टींची काळजी घ्यावी
संशोधकांनुसार नवजाताला उठवितेवेळी आणि स्तनपान करवितेवेळी काही खबरदारी बाळगण्याची गरज आहे. मातेने सर्जिकल मास्क परिधान करावा. स्तनपान करविण्यापूर्वी अवयवाची स्वच्छता करून घ्यावी आणि हात साबणाने धुवून घ्यावेत.
7 हजार प्रसूती,सर्व नवजात सुरक्षित
कोरोना महामारीच्या काळात सूरत जिल्हा आणि स्मीमेर रुग्णालयात 7 हजार प्रसूती झाल्या आहेत. बहुतांश नवजात निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत बाधित झालेले नवजातही सुखरुप आहेत. आई कोरोनाबाधित असली तरीही तिच्या दूधातील शक्तीमुळे नवजाताला किरकोळ समस्या देखील होत नाही. या गोष्टीची पुष्टी कोरोनाकाळातील आकडेवारीच देत असल्याचे स्मीमेर रुग्णालयातील प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. अश्विन वाछानी यांनी सांगितले आहे. सूरतमधील हे संशोधन आता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोरोना काळात अनेक जोडप्यांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय पुढे ढकलल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत हे संशोधन अशा जोडप्यांना दिलासा देणारे आहे.