मुरगूड येथील २२ खाऊ गल्ली व्यावसायिकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड
रविंद्र शिंदे / मुरगूड
मुरगुड स्टँड परिसरात नगरपालिकेच्यावतीने उभारल्या जात असलेल्या खाऊ गल्लीच्या कामास स्थगिती मिळाल्यामुळे 22 व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी पालिकेने उठवलेल्या खोकी धारकांना नव्याने उभारलेल्या जागेत सध्या तरी येणे शक्य नसल्यामुळे कोरोनाकाळात बंद पडलेला व्यवसाय नव्याने सुरू करताना मोठी अडचण झाली आहे. कोरोना, महापूर आणि खाऊ गल्लीच्या कामाला स्थगिती अशा असंख्य संकटाशी सामना करताना ‘आई जेवू घालेना ; अन् बाप भिक मागू देईना ! ‘ अशी अवस्था या व्यावसायिकांची झाली आहे.
मुरगूड एसटी स्टँडपासून पूर्वेकडील बाजूला मुरगुड विद्यालय इमारतीच्या संरक्षक भिंतीलगत खाऊ गल्लीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या बरोबरीने रस्त्याच्या कामाचीही पूर्तता करत शहराच्या सौंदर्यीकरणाचा टप्पा म्हणून शहरातील बसस्थानक परिसरात खाऊगल्लीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने नगरपालिकेच्या वतीने नियोजनबध्द खाऊ गल्ली उभारण्याचा निर्णय घेतला. पालिकेने सूचना देऊन खोकी उचलण्याचा आदेश दिला. हीच संधी साधत स्टॅन्ड परिसरातील काही नागरिकांनी पालिकेच्या खाऊ गल्ली उभारणीस विरोध दर्शवत न्यायालयाकडून कामास स्थगिती मिळवली. खाऊ गल्लीच्या उभारणीमुळे परिसरातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि परिसरातील नागरिकांना याचा त्रास होईल तसेच 40 फुटी रस्त्यामध्ये खाऊ गल्ली उभारल्यास वाहतुकीला अडथळा येऊ शकेल ही कारणे देऊन न्यायालयामार्फत या कामाला स्थगिती आणली.
एकूण ४० फूट रुंदीचा हा खाऊ गल्लीचा रस्ता असून यातील २५फूट रुंद भाग रस्त्यासाठी सोडला जाणार आहे. मुरगुड विद्यालयाच्या बाजूने गटार बांधकाम पूर्ण होत आले असून या गटारीलगत समान आकाराचे (८ बाय ८ फुट मापाचे) गाळे उभारण्यात येणार आहेत. एकूण २० केबिन्स एका रेषेत उभारले जाणार आहेत. दोन केबिनच्यामध्ये डस्टबिन, वॉशिंग प्लेस, वॉश बेसिन अशी सुविधा असेल. तसेच दुकान गाळ्यासमोर पेव्हिंग ब्लॉक अच्छादण्यात आली आहेत. चाळीस फुटी रस्त्यातील पंचवीस फुटाची जागा ही नागरिकांना जा- ये करण्यासाठीच्या रस्त्यासाठी वापरली जाणार आहे. तर पंधरा फूट जागा ही गाळेधारक व ग्राहक यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे. ५०% हून अधिक कामाची पुर्तता झाली आहे. स्थगितीमुळे उर्वरित काम ठप्प झाले आहे.
कोरोना महामारीने दोन वर्ष व्यवसाय पूर्णपणे बंद होते. कोरोनाचा कहर मंदावल्यावर याठिकाणी थांबलेला व्यवसाय नव्याने सुरू करण्याच्या व्यावसायिकांना अपेक्षा होत्या. पण कामाच्या स्थगितीमुळे व्यावसायिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
कराय गेलो एक अन झाले बेक !
शहर सौंदर्यीकरणांतर्गत खाऊ गल्लीतील जुने खोके हटवून पालिकेकडून एकसारखे प्रमाणबध्द नवे खोके उभा करण्याचे नियोजन आहे. यापोटी प्रत्येक व्यावसायिकांकडून वसूल भाड्यातून पालिकेच्या उत्पन्नात कायमस्वरूपी भर पडत रहावी हा पालिकेचा हेतू आहे. तर व्यवसायाचा लुक बदलल्याने व्यवसाय वृध्दी होईल अशी व्यावसायिकांची अपेक्षा होती. पण कामाच्या स्थगितीने पालिका आणि व्यावसायिकांची ‘कराय गेलो एक अन झाले बेक ! ‘ अशी अवस्था झाली आहे.