कोरोना पॉझिटिव्ह युवतीची प्रकृती स्थिर : उर्वरित पाचजणांचे स्वाब उद्या घेणार
- आणखी 31 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मुंबईहून आलेल्या सोनवडे येथील 17 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 28 व्यक्ती तिच्या संपर्कामध्ये आल्याचे उघड झाले आहे. यातील 12 व्यक्ती निकटचे नातेवाईक असून त्यातील सात व्यक्तींचे स्वाब घेऊन कोरोना तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले आहेत. तर पाचजणांचे स्वाब 2 मे रोजी घेऊन पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. त्यामुळे आता कोरोना तपासणी अहवालाकडे लक्ष लागून राहिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोन प्रवेशाच्या उंबरठय़ावर असतानाच कोरोनाची लागण झालेला दुसरा रुग्ण सिंधुदुर्गात 29 एप्रिल रोजी सापडला. कोरोनाची लागण झालेली 17 वर्षीय युवती 20 एप्रिलला अन्य सात कुटुंबियांसह जिल्हय़ात आली होती. जिल्हय़ात प्रवेश केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांची कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉट झोनमधून आल्यामुळे त्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा नमुना अहवाल निगेटिव्ह आला, तर त्या युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत त्या युवतीमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नाहीत. तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
मुंबईहून आलेली युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला असता एकूण 28 व्यक्ती तिच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये तिचे आई-वडील, भाऊ, काका, यांच्यासह संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या ठिकाणचे महसूल कर्मचारी, पोलीस व आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. या 28 पैकी 12 व्यक्ती जवळचे नातेवाईक आहेत. या 12 पैकी सातजणांचे स्वाब घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनंतर स्वाब घेतला जातो. त्याप्रमाणे उर्वरित पाचजणांना 2 मे रोजी पाच दिवस पूर्ण होणार असल्याने त्यांचे स्वाब घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान त्या युवतीच्या आई-वडिलांसह कुटुंबातील पाचहीजणांचा रिपोर्ट यापूर्वी निगेटिव्ह आला असला, तरी त्यांचा पुन्हा स्वाब घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. चाकुरकर यांनी दिली.
आणखी 31 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी 31 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी 28 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
जिल्हय़ात सद्यस्थितीत एकूण 344 व्यक्ती क्वारंटाईनमध्ये असून त्यापैकी 224 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर 120 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एकूण 72 रुग्ण दाखल आहेत. त्यातील 34 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पटिलमध्ये, तर 38 रुग्ण डेटिकेडेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. गुरुवारी आरोग्य विभागामार्फत 2727 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
घरीच अलगीकरण 0224
संस्थात्मक अलगीकरण 0120
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0375
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0347
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0002
निगेटिव्ह आलेले नमुने 0345
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0028
विलगीकरण कक्षात दाखल 0072
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0001
गुरुवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2727