प्रतिनिधी/ सातारा
मराठी हा शिकवण्याचा विषय असून मराठी भाषा ही थोडी अवघड पण समजून घेतली तर सहजसोपी भाषा आहे. ती शिकवण्याताना आकलन, आस्वाद व अन्वय हे शिक्षकांसाठी अध्यापनाचे उत्कष्ट तंत्र असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सैनिक स्कूलच्या सभागृहात झालेल्या मराठी भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, व्यवस्थापक विनायक भोसले, सौ. शिल्पा चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या, शिक्षकांनी दैनंदिन जीवनातील काही गोष्टी मुलांच्या सतत निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. वेगळय़ा दृष्टीने त्याकडे पहायला शिकवले पाहिजे. सभोवतालचे ज्ञान, मर्मदृष्टी विद्यार्थ्यांना देवून त्यांची समज वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे भाषिक कौशल्य वाढवताना त्यांना वाडमय प्रकाराचे तंत्र समजावून देण्याची गरज असते. त्यासाठी शिक्षकांनी एखाद्या गोष्टीचे स्वतः आकलन करुन घेवून त्याचा आस्वाद घेतला पाहिजे व मग अन्ययाकडे वळताना मूळ अर्थाकडे गेले पाहिजे. त्यामुळे शिकण आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे होतात.
डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, युरोपियन देशात संशोधक व लेखक म्हणून काम केलेल्या डॉ. रा. शि. ढेरे यांची मुलगी असलेल्या डॉ. अरुणा ढेरे यांचा माझ्या हस्ते होत असलेला सत्कार हा ज्ञानाचा सत्कार आहे. यावेळी त्यांनी मराठी साहित्याचा आढावाही घेतला. यावेळी उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी शिक्षकांनी अध्ययन करण्यापूर्वी खूप वाचन केले पाहिजे. त्यातील मुद्दे स्वःताला समजल्यावर विद्यार्थ्यांना शिकवताना ते सोपे होवून जातात व त्याचे आकलन विद्यार्थ्यांना लगेच होते.
यावेळी डॉ. अरुणा ढेरे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्यानंतर प्रथमच साताऱयात आल्या. त्यांचा विशेष सत्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने यांनी मनोगते व्यक्त केली. सौ. शिल्पा चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. विनायक भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास सातारा जिल्हय़ातील मराठी विषयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.