आक्षेप नोंदणीचा आज शेवटचा दिवस : मराठीत मतदारयादी अद्याप नाहीच
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून आक्षेप नेंदविण्यासाठी दि. 1 जुलैपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. पण बुधवारी सायंकाळपर्यंत मराठी भाषेतील मतदारयादी उपलब्ध करण्यात आली नाही. गुरुवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत मराठी भाषेतील मतदारयादी उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर मराठी मतदारयादी उपलब्ध करणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपली आहे. सव्वादोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. सध्या प्रशासकीय राजवटीमुळे शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच प्रशासकीय राजवटीचा कालावधी वाढत चालल्याने निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने महापालिकेची वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करून तात्कालिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण केवळ कन्नड भाषेत मतदारयादी उपलब्ध करून आक्षेप नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषेतून मतदारयादी उपलब्ध करावी, तसेच आक्षेप नोंदविण्याची मुदत वाढवावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन बुधवारी मराठी भाषेतून मतदारयादी दिली जाईल, असे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात बुधवारी सायंकाळपर्यंत मराठीत मतदारयादी उपलब्ध झाली नाही. आक्षेप नोंदविण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने मराठी भाषेतील मतदारयादी कधी उपलब्ध होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
मतदारयादी नसताना आक्षेप कसा नोंदवायचा?
महापालिकेतील अधिकाऱयांकडे चौकशी केली असता गुरुवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत मराठी भाषेतील मतदारयादी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. तसेच आक्षेप नोंदविण्याच्या अवधीत वाढ केली जाणार आहे का? याबाबत विचारणा केली असता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही मुदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक विभागाकडून मुदतवाढ दिल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत वाढवून दिली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मतदारयादी उपलब्ध नसताना आक्षेप कसा नोंदवायचा? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.