प्रतिनिधी/चिपळूण
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्तेत असली तरी स्थानिक पातळीवर आगामी निवडणुकांमध्ये आघाडीच करायची झाली तर कॉंग्रेसबरोबर करावी. मात्र शिवसेनेबरोबर नको, असा टोकाचा सूर सावर्डे येथे शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत प्रमुख पदाधिकाऱयांनी व्यक्त केला. या बैठकीतच शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या निषेधाचा ठराव मांडतानाच पूरस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांनी पाठ फिरवल्याबद्दल खंतही व्यक्त केली.
सावर्डे येथील सहय़ाद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत उपस्थित तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आढावा देतानाच कॉंग्रेसबरोबर नैसर्गिक युती कायम ठेवण्याचा सल्ला देत शिवसेनेला मात्र दूर ठेवण्याची आग्रही मागणी केली. शिवसेनेचे आमदार विकासकामे करताना राष्ट्रवादीला विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकांत त्यांच्याशी आघाडी केल्यास पक्षाला दुय्यम स्थान दिले जाईल. त्यापेक्षा कॉंग्रेसबरोबर आघाडी करणे योग्य ठरेल तर दापोली, मंडणगड, रत्नागिरी येथे राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले.
चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्यासह काही पदाधिकाऱयांनी पक्षाच्या मंत्र्यांवर टीका केली. महापुरात मोठी जीवित तसेच आर्थिक हानी झाली, मात्र पक्षाचा एकही कॅबिनेट मंत्री जिल्हय़ात फिरकला नाही, याचे दुःख वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. रत्नागिरी शहराध्यक्ष नीलेश भोसले, बशीर मुर्तुझा यांनी आम्हांला शिवसेनेकडून नेहमीच त्रास दिला जात असून आमचे चार नगरसेवक शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांच्याबाबत कोणताच निर्णय घेतला गेलेला नसल्याचे सांगून नगर परिषद स्वबळावर लढवण्याची परवानगी मागितली. रायगडमध्ये शिवसेना नेते गीते यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेबद्दल त्यांच्या निषेधाचा ठराव दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रूमाणे यांनी मांडला, तर मुंबईतील कुणबी वसतिगृहासाठी 5 कोटीच्या निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल खासदार तटकरे व महापूर काळात उल्लेखनीय काम केलेल्या आमदार निकम या दोघांच्या अभिनंदनाचा ठराव उपस्थित पदाधिकाऱयांनी या बैठकीत मांडला.
माजी आमदार संजय कदम यांनी या बैठकीत पक्षातील नेमणुकांवर बोट ठेवत कोणीही कशीही नियुक्ती पत्रे आणत असून आम्ही ज्यांना पाहिलेले नाही, तेही पदाधिकारी होत आहेत व काहीजण पदे घेऊन तोंडही दाखवत नसल्याची टीका एकेका पदाधिकाऱयाचे नाव घेत केली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी आपल्या मार्गदर्शनात पक्षवाढीच्या दृष्टीने पदाधिकाऱयांना सूचना केल्या. दुसऱयाकडे बोट दाखवण्यापेक्षा भरीव काम करून पुढे आल्यास पक्षासह विरोधकही तुमची दखल घेतात. पूरस्थितीत पक्षाध्यक्ष पवार साहेब तसेच नेते, मंत्री यांनी भरीव मदत केली. स्थानिक पातळीवर उत्तम साथ मिळाली म्हणून चिपळूण पुन्हा उभे राहिले, असे आवर्जून सांगितले.
खासदार सुनील तटकरे यांनीही पक्षबांधणीसाठी दिवाळीपर्यंत प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले. पूरग्रस्तांचे प्रश्न आणि त्यांच्या मदतीसाठी पक्षनेतृत्वाने सर्वाधिक मदत केली आहे. त्यामुळे कोणी आले नाही म्हणून नकारात्मक सूर लावू नका. आपले काम करत रहा. आगामी निवडणुकांबाबत पक्षनेतृत्वाकडून लवकरच निर्णय होईल. त्यानुसार त्याची कार्यवाही करू, असे सांगितले.