77 तारांकित, तर 221 अतारांकित प्रश्नांवर होणार चर्चा
प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन आज सोमवार दि. 18 ऑक्टोबरपासून सुरू असून त्यात एकूण 298 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी 77 प्रश्न तारांकित तर 221 प्रश्न अतारांकित आहेत. त्याशिवाय सरकारी विधेयके, लक्षवेधी सूचना, पुरवणी मागण्या व इतर कामकाजाचा त्यात अंतर्भाव आहे. प्रश्नोत्तर शून्य तास यांचाही समावेश कामकाजात असून मान्यवरांच्या निधनाबाबतचे शोक प्रस्ताव व यशाबद्दलचे अभिनंदन ठरावही चर्चेला येणार आहेत.
सावंत सरकारच्या पाच वर्षीय कालावधीतील हे शेवटचे अधिवेशन असून त्यात काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेला येणार आहेत. त्यामुळे विरोधी आमदार या सावंत सरकारच्या काळातील अखेरची संधी साधून सरकारविरोधात आवाज उठविणार, अशी चिन्हे दिसत आहेत. लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने विधानसभेत आता 39 आमदार उरले असून सभापती राजेश पाटणेकर असल्यामुळे सभागृहात केवळ 38 आमदार शिल्लक राहणार आहेत. त्यापैकी किती आमदार घरी जातील व किती आमदार विधानसभेत राहतील, हे विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दोन्ही दिवस म्हणजे सोमवारी 18 ऑक्टोबर व मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा. विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार असून नंतर भोजनोत्तर सत्र दुपारी 2.30. वा. चालू होऊन रात्रीपर्यंत कामकाज होणार आहे. मध्यंतरी चहासाठी अर्धातास तहकूब केली जाणार आहे. चालू 2021 या वर्षातील हे शेवटचे अधिवेशन असून विधानसभा निवडणुकीनंतर मार्च-एप्रिलमध्ये नवनिर्वाचित आमदारांचे अधिवेशन होणार असून ते 2022मधील पहिले अधिवेशन ठरणार आहे.