प्रतिनिधी /पणजी
संपूर्ण गोवा आज पारंपरिक, धार्मिक आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमानिशी पवित्र दिवस गणला जाणारा दसरा उत्सव साजरा करणार आहे.
गेले आठ दिवस चालू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची आज सांगता होत आहे आणि त्याचबरोबर गेले आठ दिवस नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ धान्यांचे बिजारोपण केले होते त्याला रुजवण असे संबोधतात. ते वाढलेले रुजवण काढून देवाला अपर्ण केले जाईल आणि त्यानंतर महिलावर्ग ते माळतात. आज दसरोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील बहुतेक सर्व मंदिरात विशेष पूर्जा, अर्चना आरती आणि श्रींची पालखीतून मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर सीमोल्लंघन याअंतर्गत आपटय़ाची व शमीच्या पानांची एकमेकांना प्रदान करुन सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ अशी या दिवसाची ख्याती असून हा एक पवित्र दिवस मानला जातो व यानिमित्ताने आज दसऱयाच्या शुभमुहूर्तावर अनेक प्रकल्प, व्यापारी आस्थापने कार्यान्वित केली जातील. दसरोत्सवाच्या निमित्ताने आज घरादारावर झेंडू आणि आंब्यांच्या पानांचे तोरण बांधले जाईल तसेच गाडय़ा स्वच्छ धुऊन त्यावर झेंडूच्या माळा लावून वाहनांची पूजा केली जाईल.