प्रतिनिधी/ पणजी
गोवा नागरी सेवेतील आठ अधिकाऱयांना आयएएस कॅडरात बढती देण्याचा प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंजूर केला आहे. त्यापैकी एका अधिकाऱयांने पूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे एकूण सात अधिकाऱयांचा आयएएसमध्ये समावेश होणार आहे.
आयोगाच्या निवड समितीने त्या प्रस्तावास मान्यता दिली असून त्या बैठकीस गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय उपस्थित होते. एल्विस गोम्स यांनी यापूर्वीच निवृत्ती पत्करली आहे. सर्वश्री मिनिनो डिसोझा, नारायण सावंत, संजित रॉड्रिग्स, संजीव गडकर, यतींद्र मराळकर, प्रसाद लोलयेकर, मायकल डिसोझा यांचा त्यात समावेश आहे.
श्री. गोम्स यांनी निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्याऐवजी दुसरे नाव विचारात घेण्यात आले नाही. त्या ऐवजी दुसऱया नावाला संधी मिळाली असती तर आणखी एक गोमंतकीय अधिकारी आयएएस कॅडरात समाविष्ट झाला असता. वरील सर्व नावांना मंजुरी मिळाली असून अधिकृत आदेश येणे बाकी आहे. उपरोक्त सर्व अधिकारी महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.