-जि.प.आरोग्य समिती सभेत निर्णय
प्रतिनिधी/कोल्हापूर
शुक्रवारी झालेल्या महालसीकरण मोहिमेत जिह्यातील 94 हजारांहून अधिक नागरीकांना कोरोना लसीकरण करून संरक्षित करण्यात आले. सद्यस्थितीत 23 लाख नागरीकांना पहिला डोस तर 9 लाख नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित नागरीकांना लसबद्ध करण्यासाठी 8 ऑक्टोबरला कोरोना महालसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय जि.प.च्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला.
आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती सभा पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीसच कोरोना महालसीकरण मोहिमेच्या विषयावर दिर्घकाळ चर्चा झाली. अनेक मोठÎा गावांत समाजातील विशिष्ट वर्गातून कोरोना लसीकरणाबद्दल गैरसमज असून त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नकार दिला जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. या नागरीकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी संबंधित समाज आणि धर्मातील प्रतिष्ठीत व्यक्तींची बैठक घेऊन त्यांच्यामार्फत समाजामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय झाला.
`आरोग्य’च्या पुरस्कारासाठी संवर्गनिहाय होणार गुणांकन
जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ठ काम करणाऱया कर्मचाऱयांना राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविले जाते. पण आरोग्य विभागामार्फत पुरस्कारासाठी आलेल्या फायलीच गायब झाल्यामुळे संबंधित कर्मचाऱयांकडून पुन्हा गोपनीय अहवालासह फायली घेण्यात आल्या.पण त्यामधील गुणांकन प्रक्रियेवर आक्षेप घेऊन प्रशासनाने सदरचे प्रस्ताव नाकारले. परिणामी `आरोग्य’चे शाहू पुरस्कार प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे आता या पुरस्कारासाठी नव्याने प्रस्ताव घेतले जाणार आहेत. यामध्ये पुरस्काराचे निकष ठरवताना कामनिहाय आणि संवर्गनिहाय गुणांकन केले जाणार आहे. तालुकापातळीवरून जि.प.कडे गुणांकन प्राप्त झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याची पुर्नपडताळणी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत शाहू पुरस्काराची नावे निश्चित करण्याच्या सूचना समिती सभेत देण्यात आल्या.त्यामुळे आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱया धन्वंतरी व आशा कर्मचाऱयांना दिल्या जाणाऱया पुरस्कारासोबतच शाहू पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय झाला.
औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी
जि.प. आरोग्य विभागाकडून 30 लाखांच्या नियमित औषध खरेदीचा प्रस्ताव समिती सभेत ठेवला होता. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे औषध खरेदीचा मार्ग खुला झाला आहे.
`आरोग्य’च्या विविध योजनांचा आढावा
आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱया कुटूंबकल्याण, प्रसुती, कुष्ठरोग निर्मुलन, क्षयरोग निर्मुलन, विविध लसीकरण आदी विविध योजनांचा सभेमध्ये आढावा घेण्यात आला.