बॅन्ड वाजविण्यास दिली परवानगी : संघटनेने मानले आभार
प्रतिनिधी/ बेळगाव
ऐन लग्नाच्या हंगामातच कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने लग्न समारंभांवर बंदीसह बॅन्ड वाजविण्यासही बंदी घालण्यात आली. त्यामुळे बॅन्ड वाजपी आणि मालक बेरोजगार झाले. त्यामुळे सर्वच अडचणीत आले. यावषीच्या हंगामाला तरी आम्हाला बॅन्ड वाजविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेने केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी तसेच सरकारने घेतली असून आता लग्नामध्ये बॅन्ड वाजविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बॅन्ड चालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी जिल्हाधिकाऱयांचे आभार मानले आहेत.
लग्न म्हटले की मंगलवाद्य आणि बॅन्ड आलेच. मात्र कोरोनामुळे बॅन्ड व्यावसायिकांवरही संकट कोसळले. जिल्हय़ामध्ये जवळपास 350 बॅन्ड कंपन्या आहेत. त्यामध्ये 20 ते 25 माणसे काम करत आहेत. मात्र कोरोनामुळे या सर्वांवरच मोठे संकट कोसळले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आम्हाला बॅन्ड वाजविण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली होती. मात्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नव्हता.
आता बॅन्ड वाजविण्यास परवानगी दिल्यामुळे जिल्हा मंगलवाद्य आणि बॅन्ड कलाकार संघटनेने समाधान व्यक्त केले असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे आभार मानले आहेत. अध्यक्ष परशुराम यल्लाप्पा वाजंत्री, उपाध्यक्ष बसवराज बजंत्री, संतोष महादेव बजंत्री, वासीम दस्तगीरसाब बसरीकट्टी, हणमंत बजंत्री, मल्लाप्पा कोरवर, अशोक कुडची यांच्यासह इतर बॅन्ड चालकांनी आभार मानले आहेत.