राज्यातील सगळ्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने देणार पर्जन्यमापक
रजनीश जोशी/सोलापूर
गावोगावी पडणाऱया पावसाची नोंद हवामान खात्याला ठेवता येणं अशक्मय आहे. त्यामुळे पर्जन्यमापक उपलब्ध करून ग्रामीण आणि शहरी भागातील पाऊस मोजायला विद्यार्थ्यांनाच शिकवण्याचा प्रयोग विज्ञानभारती ही संस्था करीत आहे. भारतीय हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
आरंभीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवून विद्यार्थ्यांना पाऊस मोजायला शिकवण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात श्री. कुलकर्णी म्हणाले,’आपल्या गावात नेमका किती पाऊस पडतो, त्याची नेमकी आकडेवारी हाताशी असेल तर अनेक गोष्टी करता येतात. शेतकऱयांना पीक नियोजनासाठी त्याचा फायदा होतो. गावाचा आराखडा बनवण्यासाठी आपल्या भागात किती पाऊस पडतो, किती दिवस, किती तास पडतो याची माहिती असणे गरजेचे आहे. गंमत म्हणजे, चेरापुंजीला किती पाऊस पडतो हे ठाऊक असतं, पण आपल्या गावात किती पाऊस पडतो हे माहिती नसतं. म्हणून राज्यभरातील सर्व शाळांमध्ये पर्जन्यमापक बसवून देत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाऊस कसा मोजायचा तेही शिकवत आहोत. ही यंत्रणा सौर ऊर्जेवर चालणारी असल्याने कोणालाही कोणताही खर्च करावा लागणार नाही.’
गेल्या काही वर्षात राज्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. ती अचानक निर्माण होत नसते. पावसाचे पाणी नदी-नाले, ओढ्यात मिसळते आणि त्यातून प्रवाह वाढत जातो. त्याची गावनिहाय मोजदाद स्वयंचलित वेधशाळेद्वारे करता येते. त्यामुळे पुराचे पूर्वानुमान काढता येते आणि होणारी हानी टाळण्याचे प्रयत्न करता येतात.
स्वखर्चातून यंत्रणा उभारणी
पुण्याच्या ‘इंडियन मेट्रॉलॉजी डिपार्टमेंट’मध्ये दीर्घकाळ काम केल्याने श्री. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होणे अत्यावश्यक आहे, म्हणून विज्ञानभारतीच्या सहकार्याने आपण हा उपक्रम योजला आहे. सध्या सगळा खर्च आपण स्वतः करीत आहोत, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. पालघर येथील शाळेनंतर पुण्यातील ‘गरवारे’मध्ये पर्जन्यमापक बसवून देण्यात येणार आहे.
दहा वर्षात 43 हजार पर्जन्यमापके
राज्यातील 43 हजार खेड्यांमधील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने दहा वर्षांत पर्जन्यमापक बसवण्याचा आपला मानस आहे. मोठÎ शहरांतील इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या ‘प्रोजेक्ट’चा भाग म्हणून स्वयंचलित पर्जनमापके तयार करू शकतील. त्यांना आवश्यक ती माहिती आम्हीही देऊ. दर मिनिटाची माहिती त्यामुळे मिळू शकेल.
जीवनप्रकाश कुलकर्णी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामान खाते.