या महिन्यापासून केवळ कन्नडमध्येच वीजबिल
प्रतिनिधी /बेळगाव
कानडी फलकांनंतर आता वीजबिलही केवळ कन्नड भाषेत दिले जात आहे. ऑगस्ट महिन्यात दिलेल्या बिलांमध्ये केवळ कन्नडचा समावेश असल्याने सीमाभागातून संताप व्यक्त होत आहे. कानडीकरणाचा वरवंटा अधिकच तीव्र केला जात असल्याने इतर भाषिक संतापले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच कन्नडसोबतच इंग्रजी भाषेत वीजबिल देण्याची मागणी केली जात आहे.
हेस्कॉमकडून देण्यात येणाऱया वीजबिलामध्ये यापूर्वी कन्नड व इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा समावेश होता. त्यामुळे इतर भाषिकांनाही बिलाची माहिती करून घेणे सोयीचे ठरत होते. झालेले रीडिंग, फिक्स्ड चार्जेस, मागील थकबाकी या सर्वांची माहिती
इंग्रजीमुळे प्रत्येक ग्राहकाला मिळत होती. परंतु ऑगस्ट महिन्यापासून बिलांमध्ये बदल करण्यात आला आहे. एक ऑगस्टपासून देण्यात आलेल्या बिलमध्ये केवळ कन्नड भाषेचा समावेश आहे.
मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट
सीमाभागात या ना त्या कारणाने कानडीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. कन्नड भाषेतून फलक, कागदपत्रे, सरकारी दस्तऐवज, बसवर कन्नड फलक लावले जात आहेत. त्यातच आता भर म्हणून वीज बिलातही कानडीकरण करण्याचा प्रकार घडला आहे. बिल मिळाल्यानंतर त्याची माहिती घेताना त्रास होत असल्याने मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यात मराठीसह उर्दू, तमिळ, मल्याळम, हिंदी भाषिक मोठय़ा संख्येने आहेत. त्यांना हे वीजबिल वाचणे कठीण होत असल्याने हे बिल तात्काळ मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच विद्युत बिल द्यावे, अशी मागणी इतर भाषिकांमधून होत आहे.