ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. देशात फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना लस दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली कोवोवॅक्स ट्रायल दरम्यान 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना ही लस देण्यात आली. या मुलांना Covovax चा पहिला डोस मिळाला आहे. आता दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.
देशाच्या विविध भागांतील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायलदरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान 230 सर्वात लहान मुलांना ही लस देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे. फेज 2 आणि फेज 3 मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायल ऑगस्टमध्ये सुरू झाल्या होत्या. या ट्रायलमध्ये एकूण 920 मुले सहभागी होत आहेत.