प्रेमाचा दिवस आपल्या जोडीदारासोबत, सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी गर्दी
प्रतिनिधी/ सातारा
प्रेमाचा उत्सव मानला जाणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आज उत्साहात साजरा केला जाणार आहे. विवाह झाला असो, अविवाहित असो, नवीन रिलेशनशिप असो वा जोडीदाराचा शोध घ्यायचा असो ‘व्हॅलेंटाइन डे’ ची आतुरतेने सगळेच वाट पाहत असतात. ती आतुरता व्हॅलेंटाइन वीकनंतर आज संपली आहे. रविवार असल्याने सुट्टीचा हा दिवस घालवण्यासाठी पर्यटनस्थळी गर्दी होत आहे. तसेच विविध गिफ्ट खरेदीवर तरुणाईकडून भर दिला जात आहे.
व्हॅलेंटाइन वीकनंतर आज ‘व्हॅलेंटाइन डे’ सर्वत्र साजरा होत आहे. प्रेमाचा दिवस आणि रविवार एकाच दिवशी आल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात आपल्या प्रेयसी, प्रियकराला ऑनलाइन शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रेमाचा संदेश देणाऱया इमेज पाठवून भावना व्यक्त होत आहेत. यासोबत सकाळपासून बाजापेठेतील शॉपमध्ये वेगवेगळया प्रकारची गिफ्ट, टेडी, खरेदीवर भर दिला जात आहे. गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली असून एका फुलांची विक्री 15 ते 20 रूपये झाली आहे. तरीही आपल्या जोडीदारासाठी दोन-दोन फुलांची खरेदी सुरू आहे. हा दिवस आपल्या आवडत्या ठिकाणी जावून साजरा करण्यासाठी कास, यवतेश्वर, ठोसेघर या ठिकाणी गर्दी होत आहे. हॉटेल व्यावसायिक, कॅफे मालकांनी आज विशेष ऑफर ठेवल्या आहेत. तसेच हॉटेल सजवण्यात आले आहेत. फोटो काढता येतील अशी सोय केली आहे. यामुळे हा ‘व्हॅलेंटाइन डे’ प्रेमी जोडप्यासाठी विशेष ठरणार आहे.