प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ रोड येथील आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीला 89 लाख रुपयांचा नफा झाला असून हे यश सोसायटीच्या संचालकांची एकजूट आणि कर्मचाऱयांची कार्यतत्परता, सभासदांचे सहकार्य यामुळे मिळालेले आहे, अशी माहिती चेअरमन दिगंबर राऊळ यांनी दिली.
सोसायटीची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. संस्थेकडे 84 लाखांचे भागभांडवल, 7 कोटी 14 लाखांचा राखीव निधी, 60 कोटी 37 लाखांच्या ठेवी, 52 कोटी 50 लाखांची कर्जे, 15 कोटी 45 लाखांची गुंतवणूक गतसाली झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे जग अडचणीतून वाटचाल करीत असले तरी आमच्या सोसायटीने यातूनही प्रगती साधली आहे, असे चेअरमन दिगंबर राऊळ यांनी सांगितले. संस्थेचे संचालक कृष्णा फगरे, शिवाजीराव पाटील, एम. जे. पाटील यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱया मुक्तांगण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी चेअरमन व विद्यमान संचालक एस. एम. जाधव यांनी स्वागत केले. पी. बी. माळवी यांनी पुष्पगुच्छ दिले व मागील वर्षाच्या सभेचा इतिवृत्तांत सादर केला. दिगंबर राऊळ यांनी अहवाल वाचन आणि नफा विभागणी सादर केल्यानंतर ताळेबंद पत्रकाचे वाचन इनचार्ज ऑफिसर एस. एम. मोटर यांनी केले. नफा-तोटा पत्रकाचे वाचन ए. एल. पाटील यांनी केले. अंदाजपत्रकाचे वाचन बी. के. पाटील यांनी केले. ऑडिट रेक्टिफिकेशनचे वाचन इर्शाद नंदगडकर यांनी केले. ए. एल. गुरव यांनी आभार मानले. अमित असोगेकर व अनंत लाड यांनी सूत्रसंचालन केले..