चुकांच्या दुरुस्तीसाठीही केंद्रांवर गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉक होताच आधारकार्ड नोंदणीसाठी नागरिकांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. बेळगाव वन कार्यालयासोबतच पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी नागरिक सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. परंतु दररोज ठराविक लोकांनाच प्रवेश दिला जात असल्याने अनेकांना माघारी फिरावे लागत आहे.
प्रत्येक कामासाठी आधारकार्ड महत्त्वाचे ठरत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आधार नोंदणीचे काम थांबविण्यात आले होते. आता अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा आधार नोंदणीला सुरुवात झाली आहे. जुन्या आधारकार्डमधील पत्ता, नाव, जन्म तारीख बदलासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.
पॅकेजमुळे आधारची गरज वाढली
लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय, उद्योग बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे काही व्यवसायांना राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले. यासाठी आधारकार्ड महत्त्वाचे असून त्यावर सर्व नोंदणी अचूक असणे आवश्यक आहे. पत्त्यामध्ये बदल व जन्म तारीख बदलण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु बऱयाच जणांना नोंदणी कुठे सुरू आहे, याबाबतच योग्य माहिती नसल्याने काही ठिकाणी गर्दी केली जात आहे.
येथे सुरू आहे आधारकार्ड नोंदणी
बेळगाव शहर व परिसरातील पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी करण्यात येत आहे. शहापूर, टिळकवाडी, शिवाजीनगर, दूरदर्शन नगर, हिंदवाडी, माळमारुती, नेहरुनगर, सांबरा, उद्यमबाग या कार्यालयांमध्ये आधार नोंदणी सुरू आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालय व वडगाव पोस्ट कार्यालयात लवकरच आधार नोंदणीला सुरुवात होणार आहे. याचसोबत गोवावेस, अशोकनगर, टीव्ही सेंटर व रिसालदार गल्ली येथील बेळगाव वन कार्यालयात नोंदणी करण्यात येत आहे.