वार्ताहर/ हिंडलगा
मंडोळी येथील आधार मल्टिपर्पज सोसायटीला आर्थिक वर्षात 9 लाख 36 हजार 902 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, सभासदांना 12 टक्के लाभांशाचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन गजानन फगरे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित सातव्या वार्षिक सर्वसधारण सभेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रारंभी संस्थापक शंकर गेणुचे, व्हा. चेअरमन मनिषा दळवी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतांना संचालक आप्पाजी दळवी यांनी संस्थेकडे 9 कोटी रुपयांच्या ठेवी, 5 कोटी 50 लाख कर्ज वाटप, वार्षिक उलाढाल 19 नोटी, भागभांडवल 21 लाख व 2 कोटी 36 लाख रुपयांचे गुंतवणूक असल्याची माहिती सांगुन आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट असतांना देखील 9 लाख 36 हजार 902 रुपयांचा विक्रमी नफा झाल्याचे सांगितले. अहवाल वाचन क्लार्क प्रशांत दळवी यांनी केले. याप्रसंगी मंडोळी शाळेतील शिक्षक व नुतन ग्राम पंचायत सदस्य केदारी कणबरकर व गणपत पाटील (सावगाव), ऍड. बाळकृष्ण कांबळे, मल्लाप्पा मुंगळे, पुंडलिक कदम, बाळू फगरे, जानबा बेळवटकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे वकील बाळकृष्ण कांबळे यांनी कर्ज वाटपासाठी लागणारी कागदपत्रे व कर्ज वसुलीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संचालक आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, विमल फगरे, अरुण कांबळे, कृष्णा शहापूरकर, वैजनाथ दळवी, पुंडलिक फगरे यांच्यासह सभासद, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्लाप्पा पाटील यांनी केले. प्रविण हुंदरे यांनी आभार मानले.