105 आमदारांची अधिवेशनाकडे पाठ
बेळगाव : सोमवारपासून सुवर्णविधानसौधमध्ये सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशीही आमदारांची उपस्थिती कमी होती. त्यामुळे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. सर्व आमदारांनी या अधिवेशनात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बुधवारी शून्य तासानंतर सभाध्यक्षांनी हा मुद्दा उपस्थित करून उघडपणे नाराजी व्यक्त केली. सोमवारी 224 पैकी 119 आमदारांनी अधिवेशनात भाग घेतला होता. 105 आमदारांनी याकडे पाठ फिरविली होती. संसदीय लोकशाहीला शोभणारी ही बाब नाही. त्यामुळे सर्व आमदारांनी अधिवेशनात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गैरहजर राहण्यासाठी अनेक कारणे असतात. सकारण गैरहजर राहिले तर हरकत नाही. विनाकारण गैरहजर राहू नये. संसदीय लोकशाही व्यवस्थेत अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे किमान बुधवारी तरी सर्व आमदारांनी हजर रहावे, असे आवाहन सभाध्यक्षांनी केले.