रामदुर्ग येथील घटना : पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
वार्ताहर/ रामदुर्ग
रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादवाड यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवार 20 रोजी मध्यरात्री घडली. यावेळी चोरटय़ांनी काही कागदपत्रे फाडून टाकली आहेत. तसेच आमदारांच्या वैयक्तिक टेबलाचा कुलूप तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.
आमदारांच्या निवासस्थानी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये पांढऱया रंगाच्या स्कुटीवरून तीन जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. आमदारांच्या निवासस्थानीच चोरीचा प्रयत्न करून चोरटय़ांनी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान दिले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी शंकरगौडा पाटील, सीपीआय शशिकांत वर्मा, पीएसआय नागनगौडा कट्टीमनी आपल्या फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी बेळगावहून श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. या घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.