प्रतिनिधी / पणजी
साऱया गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून असलेल्या 12 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज सोमवारी सभापती राजेश पाटणेकर निवाडा देण्याची शक्यता आहे. निवाडय़ात बहुदा विरोधकांच्या याचिकाच फेटाळल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या 10 आमदार व मगोमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या 2 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि मगो विधीमंडळ नेते सुदिन ढवळीकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर 2019 मध्ये अपात्रता याचिका सादर केल्या होत्या. सभापती राजेश पाटणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दि. 26 फेब्रुवारी रोजी याचिकावरील सुनावणी पूर्ण केली होती. केवळ निवाडा देणे शिल्लक होते. आता त्यावरील निवाडा विधानसभा अधिवेशनच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच दि. 22 रोजी त्यावर अंतिम निवाडा दिला जाणार आहे. सभापतींनी या करीता काँग्रेस आणि मगोच्या नेत्यांना आज प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहाण्याचे निमंत्रण दिले आहे. साधारणतः सकाळी 11 वा.च्या दरम्यान यावर सुनावणी होईल.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमध्ये सभापती राजेश पाटणेकर हे या दोन्ही याचिका यांत्रिक मुद्यावर आधारित फेटाळून लावण्याची दाट शक्यता आहे आणि तसे झाल्यास सभापतींच्या निवाडय़ाच्या विरोधात काँग्रेस व मगो नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्या ऐवजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर करावी लागणार आहे. आजच्या या याचिकेकडे साऱया राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.