कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांची माहिती
प्रतिनिधी / कारवार
कारवार व अंकोला तालुक्यातील रुग्णवाहिका समस्या दूर करण्यासाठी आमदार विकास निधीतून चार रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसात त्या सेवेत रुजू होणार आहेत, अशी माहिती कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी दिली. कारवार तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस व नगरपालिका अधिकाऱयांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
नवीन खरेदी करण्यात येणाऱया चार रुग्णवाहिकांपैकी कारवार व अंकोला तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी प्रत्येकी एक आरक्षित असतील, या रुग्णवाहिका अद्ययावत, सुसज्जित आणि सर्व वैद्यकीय सुविधांसह परिपूर्ण असतील, येथील बाजारपेठेतील व्यापाऱयावर अधिकारी लॉकडाऊनच्या नावाखाली अन्याय करीत आहेत, अशा तक्रारी केल्या जात आहेत. नगरपालिकेच्या अधिकाऱयांनी मासळी विक्रेत्यांवर दमदाटी आणि अन्याय करू नये, कोरोना नियमावली अंमलात आणताना भेदभाव करू नये, असे स्पष्ट करून कर्फ्यू किंवा लॉकडाऊनच्या नावाखाली गरीब आणि व्यापाऱयांवर अन्याय होऊ नये याची गांभीर्याने दखल घेण्याची सूचना करवार नगरायुक्तांना केली.
कोरोना बाधितांना उपचाराच्या बाबतीत योग्य ती माहिती दिली जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारीही केल्या जात आहेत. त्याकरिता आरोग्य खात्याच्यावतीने येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साहाय्यवाणी सुरू करण्याची सूचना करून आमदार नाईक पुढे म्हणाल्या, साहाय्यवाणी कक्षात दोन कर्मचाऱयांची नेमणूक करावी, कोणते डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध आहेत याची माहिती साहाय्यवाणीकडून मिळाली पाहिजे. बाधितांवर कोणत्या वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत याची माहिती संबंधित डॉक्टर आणि हेल्प डेस्ककडे उपलब्ध असली पाहिजे.
पौष्टिक आहार उपलब्ध करा
उपचारादरम्यान बाधितांना पौष्टिक आहार उपलब्ध करून द्या, अशी सूचना करून त्या पुढे म्हणाल्या, जेवणात कॅल्शियम व प्रोटीनचे प्रमाण अधिक असले पाहिजे. उत्तम आहार व उपचारामुळे बाधितांना कोरोनावर मात करणे सोपे जाते. कोविड वॉर्डमध्ये ऑक्सिजन, गरम पाणी आदीची कमतरता पडणार नाही याची दक्षता घ्या, कोरोना वॉर्डात दुरवस्था आढळल्यास कारवाईचा इशारा त्यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना दिला. ग्रामीण प्रदेशात बाधितांवर घरीच उपचार करण्याऐवजी समुदाय भवन, सभागृहे, हॉस्टेलच्या इमारतीत उपचार करावे, नगरपालिकेने कारवार शहरात स्वच्छता टिकवून ठेवावी, त्या करिता रस्त्यांचे सॅनिटायझेशन करावे, अशी सूचना केली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नितीन पीकळे, कारवारचे तहसीलदार, नगरायुक्त आदी उपस्थित होते.