प्रतिनिधी / आटपाडी
धनगर समाजाचे नेते भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांना ढोलवादन करत विधान परिषदेत प्रवेश नाकारल्याने समर्थक कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी मंगळवारी जागोजागी ठाकरे सरकार निषेधाच्या घोषणा देत ढोल वादन केले.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईत पारंपरिक वेशभूषा करत ढोलसह आंदोलन केले. या आंदोलनाला आणि फलकाना पोलिसांनी अटकाव केला. ढोल काढून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण आमदार पडळकर यांनी ढोल वादन कायम ठेवले. त्यातून त्यांना ताब्यातही घेण्यात आले. भाजपच्या अनेक आमदारांनी आम्हालाही अटक करा असे आव्हान दिल्यानंतर हे आंदोलन कायम राहिले.
आमदार पडळकर यांना ढोल वाजविण्यात अटकाव केल्याने समर्थकांनी आणि समाज बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदविला. आटपाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा देत आमदार पडळकर यांच्या समर्थनात ढोल वाजविण्यात आले.