आयटीआय मॅनेजमेंट असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
आयटीआय महाविद्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहे. दहा वर्षे झाली तरी अनेक कॉलेजंना अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला कमी वेतनावर काम करावे लागत आहे. तेव्हा तातडीने सर्व्हे करून महाविद्यालयांना अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य खासगी आयटीआय मॅनेजमेंट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील 1997 पासूनच्या आयटीआय महाविद्यालयांना अनुदान दिले नाही. त्यामुळे त्यामध्ये काम करणारे सर्व शिक्षक, कर्मचारी अडचणीत आले आहेत. सध्या केवळ 10 ते 12 हजार रुपये वेतनावर काम करत आहे. उच्चशिक्षण घेऊन मिळणारे हे वेतन तुटपुंजे आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. तेव्हा तातडीने 1997 पासूनच्या सर्व आयटीआय महाविद्यालयांना अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवत असतो, अभियंता बनवत असतो. मात्र, आमचीच अवस्था गंभीर झाली आहे. या मागणीसाठी आम्ही हुबळी ते बेंगळूर अशी पदयात्रादेखील काढली. तरीदेखील सरकारने लक्ष दिले नाही. तेव्हा तातडीने सर्व महाविद्यालयांना अनुदान द्यावे व आम्हाला सरकारी नियमांनुसार वेतन व इतर सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष अडिवेश इटगी, ललीत कुंभार, व्ही. के. मुल्ला यांच्यासह जिह्यातील अनेक महाविद्यालयांमधील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.