10 वर्षांमध्ये 7.5 लाख कोटी महसूल प्राप्तः 15 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार
वृत्तसंस्था/ मुंबई
माहिती आणि तंत्रज्ञान(आयटी)कंपन्या आगामी आर्थिक वर्षामध्ये 4.5 लाख जणांना रोजगार देणार आहेत. याचदरम्यान सदरच्या कंपन्यांचा महसूल प्रथमच 15 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे, अशी माहिती आयटी इंडस्ट्री बॉडी नॅस्कॉम यांनी आपल्या अहवालामध्ये दिली आहे.
आयटी इंडस्ट्री बॉडी नॅस्कॉम यांनी म्हटले आहे, की 2022-23 म्हणजे एप्रिल 2022 पासून मार्च 2023 च्या दरम्यान हे क्षेत्र महिलांनाही रोजगार देण्याबाबत नंबर एकवर राहणार आहे. यामध्ये जवळपास 18 लाख महिलांचा समावेश होणार असल्याची शक्यता आहे. भारतीय आयटी उद्योगाचा महसूल हा आगामी वर्षात जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांनी वाढणार असल्याचीही नेंद केली आहे.
कोरोना पूर्व वातावरणाशी तुलना
नॅस्कॉम यांच्या अहवालानुसार आयटी इंडस्ट्रीज कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीत म्हणजेच पूर्वपदावर येऊ पाहते आहे. वर्ष 2019 मध्ये होती तशी स्थिती या क्षेत्रात सध्या तयार होत असून हा वेग येत्या काळात दुप्पटीने वाढत जाणार आहे. यासोबतच एकूण कर्मचाऱयांची संख्या 50 लाखाच्या घरात पोहोचणार असल्याचे म्हटले आहे.
निर्यात महसूलाचा समावेश
या इंडस्ट्रीजचा महसूल निर्यातीमधून 178 अब्ज डॉलर्सचा होणार असून 17 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अन्य महसूल हा देशातील बाजारातून प्राप्त होणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
टॉपच्या कंपन्यांकडून अपेक्षा
साधारणपणे टॉपच्या पाच माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या दरम्यान 1.82 लाख प्रेशर्सना नोकरी देण्याच्या तयारीत असून यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांच्यासोबत इन्फोसिस या कंपनीचाही समावेश आहे.