नरेश गावणेकर / फोंडा
9 एप्रिलपासून 14 व्या आयपीएल क्रिकेटचा रणसंग्राम सुरु होणार आहे. ही रणधुमाळी गोवेकरांसाठी विशेष उत्सुकतेची असेल, कारण या स्पर्धेसाठी गोव्याच्या सुयश सुजय प्रभुदेसाईची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघात निवड झाली आहे. स्पर्धेत पदार्पण करणारा सुयश प्रभुदेसाई यात खेळण्यास सज्ज झाला असून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक आहे. याविषयी त्याची मुलाखत घेतली असता आपल्या निवडीबद्दल तो एकदम खुश असल्याचे जाणवले. उत्कृष्ट खेळ करुन आपली निवड सार्थ ठरवेन, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघात खेळायला मिळणार, याविषयी विचारले असता, त्याने विराट कोहली हा आपला आदर्श खेळाडू असल्याचे सांगितले. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळणे यापेक्षा वेगळे भाग्य अजून काय असेल. एक सर्वोत्कृष्ट खेळाडू व कर्णधार म्हणून त्याची ख्याती आहे. त्याच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. याशिवाय संघात इतर अनेक अनुभवी व उत्कृष्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत खेळताना आपल्या अनुभवात भर पडेल. आयपीएल ही उच्च पातळीवरील स्पर्धा आहे. सर्व संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांना सामोरे जाण्याची ही नामी संधी आहे, असेही सुयश प्रभुदेसाई यांनी सांगितले.
9 एप्रिल रोजी आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. स्वप्नील अस्नोडकर, शादाब जकाती, सौरभ बांदेकर व आदित्य आंगले यांच्यानंतर आयपीएल स्पर्धेत निवड झालेला गोव्याचा तो पाचवा खेळाडू आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये खेळणारा तो गोमंतकीय खेळाडू असेल. 23 वर्षीय सुयशने गोवा संघातर्फे मुश्ताक अली स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध खेळताना केवळ 22 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या होत्या. बडोदाविरुद्ध नाबाद 60 धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तसेच निवड चाचणीच्या आधारावरुन आरसीबी संघात त्याची निवड झाली आहे.
यानंतर बेंगलोर येथे झालेल्या शिबिरात तो दाखल झाला होता. तेथे प्रशिक्षक संजय बांगर व माईक हॅसन (न्यूझीलंड) यांच्याकडून मार्गदर्शन लाभले आहे. नंतर गोव्यात आल्यानंतर त्याने त्याचा ‘गुरु’ प्रशिक्षक संदीप नाईक यांच्याकडून धडे गिरवले आहेत. कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलीयर्स तसेच इतर स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची त्याला उत्कंठा लागली आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुरेश रैना व विराट कोहली हे त्याचे आदर्श खेळाडू आहेत.
लहानपणापासून क्रिकेटची आवड
तरवळे-शिरोडा येथील प्रभुदेसाई कुटुंबीय हे क्रिकेटवेडे आहे. गेल्या अनेक वर्षापासून तरवळे स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ते राज्य पातळीवरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. या क्लबचे राज्यातील क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्याचे वडील सुजय, ज्येष्ठ काका गुरुदास, पद्मनाभ, जयंत व संदेश प्रभुदेसाई हे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. घरात क्रिकेटचे वातावरण असल्यामुळे सुयशला लहानपणापासून क्रिकेटची आवड निर्माण झाली. क्लबचे सर्वेसर्वा डॉ. गोपीनाथ प्रभू सावकर यांचेहे त्याला प्रोत्साहन लाभले. 6-7 वर्षांचा असताना वडील त्याला प्रथम तरवळे व त्यानंतर काराय-शिरोडा मैदानावर घेऊन जायचे. त्याची प्रगती दिसून आल्यानंतर प्रशिक्षणासाठी त्याला फातोर्डा येथे प्रशिक्षक संदीप नाईक यांच्या शिबिरात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याला खरा ‘गुरु’ भेटला, असे ते म्हणतात. व्यवस्थित प्रशिक्षण घेता यावे यासाठी सुयशला मडगावच्या महिला नूतन हायस्कूलात घालण्यात आले. 14, 16, 19 व 25 वर्षाखालील गोवा संघाचे त्याने कर्णधारपद भूषविले आहे. गेल्या तीन वर्षापासून गोवा रणजी संघात तो खेळत आहे. दक्षिण भारतीय 19 वर्षाखालील संघाचे त्याने नेतृत्व केले आहे. चॅलेंजर्स चषक स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लू संघात तो खेळला आहे. शुभमन गिल हाही या संघात होता.
जीसीएचे आभार
आपल्याला गोव्याच्या कनिष्ठ तसेच वरिष्ठ संघात स्थान देऊन विश्वास दाखविल्याबद्दल तसेच आयपीएलमध्ये निवड होण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल सुयशने गोवा क्रिकेट संघटनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱयांचे आभार मानले आहेत. त्यांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असल्याचे तो म्हणाला. आपल्याला घडविण्यात मोलाची कामगिरी केलेल्या आई-वडिल तसेच सर्व काका व कुटुंबीयांचे त्याने आभार मानले.
कुटुंबात आनंदाचे वातावरण
आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघात सुयशची निवड झाल्याबद्दल प्रभुदेसाई कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या संधीचे तो नक्कीच चीज करेल, असा विश्वास त्यांना वाटतो. वडील सुजय म्हणतात, क्रिकेट हे त्याचे वेड आहे. त्याच्या यशात संदीप नाईक सर व जीसीएचे मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांचे आभार. मितभाषी सुयश हा मनमिळावू आहे. यशाने हुरळून न जाणारा व अपयशाने न खचणारा आहे. चुका सुधारणे, दुसऱयांचे ऐकणे व वडिलधाऱयांचा आदर करणे, हा त्याचा स्वभाव आहे, असे त्याचे वडील सांगतात.
टप्प्या टप्प्याने उच्च ध्येय साध्य करणार
भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न आहे काय? या प्रश्नावर सुयश म्हणाला की, प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असते. टप्प्याटप्प्याने आपण विकसित होऊन आपले उच्च ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी अथक मेहनत, चिकाटी व प्रशिक्षकावर विश्वास ठेवल्यास हे साध्य होऊ शकते. आपणही भारतासाठी खेळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करण्यावर भर देणार असल्याचे तो म्हणाला. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सुयश सध्या चेन्नई येथे बेंगलोर संघात दाखल झाला आहे. गोवेकरांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत.