यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेची रुपरेषा आज (शुक्रवार दि. 4) जाहीर केले जाईल, अशी घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केली. यंदाची स्पर्धा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली असली तरी अद्याप त्याची रुपरेषा निश्चित नाही. त्यामुळे, सखेद आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, आता त्यावर पडदा पडेल, अशी चिन्हे असून आज आयपीएल कार्यकारिणी समिती अध्यक्ष ब्रिजेश पटेल वेळापत्रक जाहीर करतील, असे संकेत आहेत. अर्थात, आज स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल की टप्प्यात केले जाईल, याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.
या स्पर्धेदरम्यान दुबई ते अबुधाबी किंवा शारजा ते अबुधाबी असा प्रवास करणाऱया प्रँचायझी व खेळाडूंना त्यांनी स्वतःला प्रवासादरम्यान अलग ठेवले असेल तर क्वारन्टाईन होण्याची शक्यता नाही, असे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आयपीएलची रुपरेषा मागील आठवडय़ातच जाहीर होणार होती. पण, चेन्नई संघातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि बीसीसीआयला त्यावर लक्ष केंद्रित करावे लागले होते. तूर्तास, चेन्नईच्या पथकातील अन्य सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना शेवटच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.