वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अबु धाबीत होणाऱया उर्वरित आयपीएल स्पर्धेतून इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी माघार घेतली आहे. सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये बेअरस्टो आणि मलान यांचा समावेश होता. वैयक्तिक कारणांमुळे आपण खेळू शकणार नसल्याचे त्यांनी आपल्या व्यवस्थापनाला कळवले.
कोरोना महामारी समस्येमुळे इंग्लंड-भारत यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. मँचेस्टरमधून इंग्लंड आणि भारताचे क्रिकेटपटूंना एकत्रितपणे अबु धाबीला प्रयाण करावे लागत असल्याने कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी बेअरस्टो आणि मलान यांनी आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे संकेत आहेत. अबु धाबीत दाखल झाल्यानंतर तिथे आणखी 6 दिवस क्वारन्टाईन रहावे लागणार होते, त्यावरही या उभयतांचा आक्षेप होता.