मुंबई/प्रतिनिधी
प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली होती. आता जावेद अख्तर यांच्या विरोधात आरएसएस तालिबान तुलना प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून अख्तर यांना न्यायालयाने प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जावेद अख्तर यांनी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना तालिबानशी तुलना केल्याप्रकरणी आता न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या या तक्रारीमुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणाऱ्या विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल केला आहे. आता खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांना पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.