वेध महापालिका निवडणुकीचे : काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडीसह अपक्षांची गणिते आणि जुळवणी सोमवारनंतर होणार सुरू : आम आदमी, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी, रिपाइंचीही तयारी
कोल्हापूर / संजीव खाडे
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला अजून अवकाश असला तरी निवडणुकीच्या तयारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी 21 डिसेंबर रोजी 81 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये प्रभागावर पडणाऱ्या आरक्षणावर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सोमवारच्या आरक्षण सोडतीवर या सर्वांच्या राजकीय नजरा लागल्या आहेत. त्यानंतर राजकीय जुळवणी आणि गणिते सुरू होणार आहे.
2015 मध्ये झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली. काँग्रेस नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नियोजन आणि मुसद्दीगिरीमुळे त्यावेळी राज्य मंत्रिमंडळात बडे मंत्री असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पिछेहाट झाली. चंद्रकांतदादांची भाजप आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी यांचे महापालिकेवरील सत्ता स्थापनेचे स्वप्न स्वप्नच राहिले. गेल्या पाच वर्षात महापालिकेत सत्ताबदलच्या चमत्काराची भाषा भाजपकडून झाली. पण प्रत्यक्षात चत्मकार झाला नाही. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्याआधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीचा प्रयोग कोल्हापूर महापालिकेत यशस्वी झाला.
आता पाच वर्षांनी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजप – ताराराणी आघाडी निवडणुकीला समोरे जाणार आहेत. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आरक्षण सोडतीने प्रारंभ होणार असल्याने या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकीय गणिते मांडण्यास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी पक्ष, रिपाइं आदी पक्ष, संघटनांनीही महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत मुदत संपलेल्या महापालिकेच्या सभागृहातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि विरोधक भाजप – ताराराणी यांच्यात चुरशीची लढत होणार असली तर या दोन्हीतील नाराजांवरही इतर पक्षांचीही नजर आहे. आता आरक्षण सोडतीनंतर प्रभाग नेमका कोणता असणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोमवारी ही प्रक्रिया पार पडल्यानंतर इच्छुक उमेदवारांना राजकीय मार्ग सापडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी, विरोधी पक्षांसह नव्याने निवडणूक रिंगणात उतरू पाहणाऱ्या पक्ष, संघटनांनीही तयारी सुरू केली आहे. आरक्षणानंतर त्याला आणखीन गती येणार आहे.
महापालिकेच्या मुदत संपलेल्या सभागृहातील पक्षीय बलाबल
पक्ष सदस्य संख्या
काँग्रेस 30
राष्ट्रवादी 14
भाजप 14
ताराराणी आघाडी 19
शिवसेना 4
एकूण सदस्य 81