पंजाब किंग्सवर 6 धावांनी रोमांचक विजय, मॅक्सवेल सामनावीर
वृत्तसंस्था/ शारजाह
सामनावीर ग्लेन मॅक्सवेलचे धडाकेबाज अर्धशतक व यजुवेंद्र चहलची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने पंजाब किंग्सवर केवळ 6 धावांनी विजय मिळवित आयपीएलच्या प्लेऑफमधील स्थानही निश्चित केले. प्लेऑफमध्ये स्थान मिळविणारा दिल्ली, चेन्नईनंतर आरसीबी हा तिसरा संघ बनला आहे.
प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर मॅक्सवेलने 33 चेंडूत 57 धावा फटकावत आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 164 धावांची मजल मारून दिली. त्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतरही पंजाब किंग्सला 20 षटकांत 6 बाद 158 धावांवर रोखत आरसीबीने रोमांचक विजय मिळविला. फिरकी गोलंदाज चहलने मधल्या षटकांत भेदक मारा करीत 29 धावांत 3 बळी मिळविले.
आरसीबीने 12 सामन्यांत 16 गुण मिळवित शेवटच्या चार संघांतील स्थान निश्चित केले. पंजाब किंग्सचे 13 सामन्यात 10 गुण झाले असून त्यांचा फक्त एक साखळी सामना बाकी आहे. राजस्थान रॉयल्सचेही 10 गुण झाले असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे पंजाबला 12 गुणांपर्यंतच मजल मारता येऊ शकते. मुंबई इंडियन्स व पेकेआर (रविवारच्या सामन्याआधी) यांचेही प्रत्येकी 10 गुण आहेत. मात्र हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
पंजाबसाठी हा आणखी एक ‘क्लोज’ सामना ठरला, ज्यात ते विजय मिळवू शकले नाहीत. कर्णधार केएल राहुलकडे याचा दोष जातो. त्याने 39 धावा जमविण्यासाठी 35 चेंडू घेतले, त्याचा फटका संघाला बसला. अनेक सामन्यात त्याने संघाला विजयसमीप आणणारी कामगिरी केली. पण मध्यफळीने प्रत्येकवेळी दगा दिल्याने अगदी थोडक्यात त्यांना सामने गमवावे लागले आहेत. या मोसमात पंजाब किंग्सची मध्यफळी ही सर्वात ठिसूळ मध्यफळी ठरली आहे. 11 व्या षटकापर्यंत पंजाबने बिनबाद 91 धावा जमविल्या होत्या. पण राहुल शाहबाज नदीमला उत्तुंग फटका मारण्याच्या नादात सीमारेषेजवळ झेलबाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती सुरू झाली आणि त्यांना 20 षटकांत 6 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. निकोलस पूरन (11 सामन्यांत 100 हून कमी धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला. चहलला स्वीप शॉट मारताना तो झेलबाद झाला तर सर्फराज खानला चहलने आपल्या फिरकीवर फसवत त्रिफळाचीत केले. अगरवालही अर्धशकानंतर चहलचा बळी ठरला. त्याने 42 चेंडूत 57 धावा काढल्या.
शेवटच्या दोन षटकांत पंजाबला 27 धावांची गरज असताना सिराजने 19 व्या षटकात अप्रतिम मारा करीत केवळ 8 धावा दिल्याने पंजाबसाठी शेवटच्या 6 चेंडूत 19 धावा असे समीकरण बनले. हर्षल पटेलने अखेरच्या षटकात अचूक मारा करीत केवळ 12 धावा देत आरसीबीला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, आरसीबीलाही मध्यफळी कोसळल्याचा फटका बसला. देवदत्त पडिक्कल (38 चेंडूत 40) व कर्णधार कोहली (24 चेंडूत 25) यांनी 68 धावांची सलामी दिली. पण बहरात असणाऱया मॅक्सवेलने षटकारांची आतषबाजी करीत 29 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. त्याने एकूण 4 षटकार व 3 चौकार मारले. त्याने एबी डीव्हिलियर्ससमवेत चौथ्या गडय़ासाठी 73 धावांची भर घालत संघाला बऱयापैकी आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. डीव्हिलियर्सने 18 चेंडूत 2 षटकार, एक चौकारांच्या मदतीने 23 धावा फटकावल्या.
कोहलीने चौकार मारून सुरुवात केली तर पडिक्कलने अर्शदीप सिंगने टाकलेल्या तिसऱया षटकात दोन षटकार, कटचा चौकार मारत या षटकात एकूण 13 धावा वसूल केल्या. पडिक्कलने नंतर रवि बिश्नोईलाही टार्गेट करीत षटकात 2 चौकार मारले. पाचव्या षटकात कोहलीला सर्फराजकडून जीवदान मिळाल्यानंतर त्यानेही फटकेबाजी सुरू केली. या जोडीने पॉवरप्लेमध्येच बिनबाद 55 अशी मजल मारून दिली होती. आठव्या षटकात तिसऱया पंचांनी पडिक्कलला नाबाद ठरविले. मात्र मोईजेस हेन्रिक्यूजने झटपट तीन बळी मिळवित आरसीबीला लगाम घातला. त्याने कोहलीला त्रिफळाचीत केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर डॅन ख्रिश्चनला झेलबाद केले. त्यानंतर त्याने पडिक्कललाही राहुलकरवी झेलबाद केल्यानंतर त्यांची स्थिती 3 बाद 73 अशी झाली होती. मॅक्सवेलने फटकेबाजी केल्यामुळे त्यांना 160 च्या पुढे मजल मारता आली. मोहम्मद शमी व हेन्रिक्यूज यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक ः आरसीबी 20 षटकांत 7 बाद 164 ः कोहली 25 (24 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पडिक्कल 40 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मॅक्सवेल 57 (33 चेंडूत 4 षटकार, 3 चौकार), डीव्हिलियर्स 23 (18 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), शाहबाज अहमद 8, श्रीकर भरत नाबाद 0, गॅर्टन 0, पटेल 1, अवांतर 10. गोलंदाजी ः शमी 3-39, हेन्रिक्यूज 3-12.
पंजाब किंग्स 20 षटकांत 6 बाद 158 ः राहुल 39 (35 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), मयांक अगरवाल 57 (42 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), पूरन 3, मॅरक्रम 20 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सर्फराज खान 0, शाहरुख खान 16 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हेन्रिक्यूज नाबाद 12 (9 चेंडूत 1 षटकार), हरप्रीत ब्रार नाबाद 3, अवांतर 8. गोलंदाजी ः यजुवेंद्र चहल 3-29, गॅर्टन 1-27, शाहबाज अहमद 1-29).