गोमेकॉ डिनपदी डॉ. बांदेकरच राहणार असल्याचा दावा : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या डॉ. तिवारीच्या नियुक्तीस विरोध
प्रतिनिधी /पणजी
गोमेकॉच्या डिनपदावर डॉ. जयप्रकाश तिवारी यांची नेमणूक केल्यानंतर ती स्थगित ठेवण्याची पाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आली असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्तक्षेपानंतर डॉ. सावंत हे तोंडघाशी पडल्याचे आणि त्यांना दणका मिळाल्याचे समोर आले आहे. डॉ. सावंत व सरकारच्या या निर्णयास राणे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीचा हा आदेश मागे न घेता स्थगित ठेवला आहे.
डॉ. सावंत यांच्याकडे असलेल्या पर्सनल खात्याकडून डॉ. तिवारी यांच्या नेमणुकीचा आदेश काढण्यात आला होता. गोवा लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांनी नेमणूक केली होती. तथापि, राणे यांनी त्या नेमणुकीस हरकत घेतली आणि तो आदेश स्थगित करण्यास डॉ. सावंत यांना सांगितले.
डॉ. शिवानंद बांदेकर हे डिन पदावर कार्यरत असून तेच तेथे कायम राहातील असे स्पष्टीकरण राणे यांनी प्रसारमाध्यमांकडे दिले. त्यामुळे गोमेकॉतील विषयावरुन डॉ. सावंत व राणे यांच्यातील वैरत्व पुन्हा एकदा उघड झाले आहे.
बांदेकर यांच्याकडे तब्बल तीन पदे
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे आरोग्य क्षेत्रात दोन पदे असू शकत नाहीत. डॉ. बांदेकर हे गोमेकॉचे मेडिकल अधीक्षक (सुपरिटेंडंट) असून डिन पदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे आहे.
यापूर्वी असलेले डिन प्रदीप नाईक यांची बदली झाल्यामुळे ते पद रिक्त होते. म्हणून त्याचा ताबा डॉ. बांदेकर यांच्याकडे देण्यात आला होता. शिवाय ते अस्थिरोग विभागाचे प्रमुखही आहेत. अशा प्रकारे तीन पदे एक व्यक्ती कशी सांभाळू शकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणास्तव डॉ. तिवारी हे ज्येष्ठ असल्याने त्यांची नेमणूक डिन पदासाठी करण्यात आली होती. तथापि, राणे यांनी ती रोखली आणि डॉ. बांदेकरानाच डिन पदावर अतिरिक्त ताब्यासह कायम ठेवले आहे.
दरम्यान, डॉ. तिवारी यांच्या नेमणूक आदेशाला स्थगिती देणारा किंवा डॉ. बांदेकर यांना डिनपदी कायम ठेवणारा असा कोणताही आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही.