विविध ठिकाणी जागतिक योग दिन साजरा : योगासनाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, शाळांमध्ये गुगल मीटद्वारे योग दिनाचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
भांदूर गल्ली मरगाई योग मंदिर
मरगाई योग मंदिर भांदूर गल्ली, बेळगाव यांच्यावतीने योगदिन आयोजित करण्यात आला. योग शिक्षक महादेव चौगुले व अभिनंदन परमाज यांच्या हस्ते पतंजलीच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यान धारणा करण्यात आली. सूत्रसंचालन विजय घाटगे यांनी केले.
याप्रसंगी योगसाधक रेखा मुतकेकर, गौतमी पाटील, शोभा पाटील, स्नेहल पाटील, रुपाली पाटूकके, अनुराधा घाटगे, गीता गेंजी, विद्या पाटील, प्रीती नाईक, सुनीता धामणेकर, स्नेहा कोवाडकर, नंदा गंगण्णावर, संजना बादे तसेच विठ्ठल मोरे, अनंत चौगुले, रामचंद्र पाटील, सिद्धी, गौरी, चित्रा, स्वामिनी आदी उपस्थित होत्या. विजय चौगुले यांनी आभार मानले.
काहेरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन
केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (काहेर) यांच्यावतीने सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमामध्ये केएलईचे पदाधिकारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी कुलगुरु प्रा. डॉ. विवेक सावजी म्हणाले, सूर्यनमस्कारामुळे दिवसाची चांगली सुरुवात होऊन ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. कोरोना काळात नागरिकांची आरोग्य क्षमता वाढविण्यासाठी प्राणायाम व इतर आसने महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी सांगितले. काहेरचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. श्रीनिवास प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. डॉ. संदीप सागरे यांनी योगासन स्पर्धेविषयी माहिती दिली. केएलई कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या योग शिक्षिका नव्या यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. यावेळी 140 हून अधिक कर्मचारी व 450 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
समर्थनगर येथे योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सोमवारी समर्थनगर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या शाळांना सुटी असल्याने मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना योगाभ्यास शिकविला जात आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून माला कणेरी या लहान मुलांना योगासने शिकवत आहेत.
ग्रामीण भाजपच्यावतीने योग दिन
बेळगाव ग्रामीण भाजपच्यावतीने ग्रामीण भागातील चार ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत योगदिन आयोजित करण्यात आला.
उचगाव, कर्ले, के. के. कोप्प, तारिहाळ येथे आयोजित शिबिरात के. के. कोप्प मठाचे स्वामीजी, चेतन अंगडी, पतंजली योगपीठाचे सदस्य नारायण पाटील, बसवराज दमणगी, पंकज घाडी, नरसिंग देसाई, पवन देसाई, प्रदीप पाटील, मनोहर कडोलकर, रामचंद्र मन्नोळकर, लिंगराज हिरेमठ आदी उपस्थित होते.
कैवल्य योग मंदिरात योग दिन
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग तज्ञ उषा कुलकर्णी यांनी महिलांकडून योग सराव करून घेतला. कैवल्य योग मंदिर येथे कित्येक वर्षापासून दुपारच्या सत्रामध्ये भरत असलेल्या योग वर्गात उषा कुलकर्णी योग साधना शिकवितात. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून त्यांनी दुपारी महिलांच्या उपस्थितीत योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.
डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज
केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पतंजली योग समितीचे अमर कांगो यांनी योगाविषयी माहिती देत योगासने करून दाखविली.
यावेळी प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी म्हणाले, योग साधनेमुळे मन, शरीर यांच्यामध्ये एकाग्रता आणता येते. त्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी योगासने करण्याचे आवाहन त्यांनी केले. 150 हून अधिक कर्मचारी तसेच शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
बालिका आदर्श विद्यालय
बालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी युनिटच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. गुगल मीटद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला. विश्वास गावडे यांनी मार्गदर्शकांची ओळख करून देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले.
मार्गदर्शक म्हणून किणये गावचे विजय देसाई, देवेंद्र हुंदरे, राजू डुकरे आणि अंकिता सुतार यांनी योग प्रकार व्हिडिओच्या साहाय्याने दाखविले. यावेळी मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.