वार्ताहर/ सावईवेरे
सावईवेरे येथील इयत्ता पहिलीत शिकणारी कु. आरोही दीपक वेरेकर हिने अखिल गोवा ऑनलाईन एकपात्री संवाद स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. महात्मा गांधी या विषयावर अबसास व लायन्स क्लबतर्फे या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आरोही हिने महात्मा गांधी यांची सुरेख भूमिका सादर केली. सांखळी येथील सेन्ट ऍनिस परप्येच्युअलची ती विद्यार्थीनी असून वेशभूषा, चित्रकला, गायन नृत्य कलेतही निपूण असून तिने शालेय स्तरावर अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. अभ्यासातही ती अतिशय हुशार आहे. गेल्यावर्षी अखिल गोवा पातळीवरील साखळी येथील गणेशोत्सव व शिगमोत्सवातील वेशभूषा स्पर्धेत तिने प्रथम बक्षिस मिळवले. शिवाय सावईवेरे येथे शारदोत्सवानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक पटकाविला.